मुंबई- सायबर भामट्यांनी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेची पावणे चार कोटींची फसवणूक केली आहे. या महिलेला घाबरविण्यासाठी त्यांनी दुरदृश्यप्रणालीलाद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) पोलीस ठाणे आणि न्यायालयाचा देखावा उभा केला. त्यात तोतया न्यायाधीश उभे करून बनावट सुनावणी देखील घेण्यात आली होती. या फसवणुकीप्रकऱणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल केल्याचा दावा

तक्रारदार महिला ६८ वर्षांच्या असून अंधेरी येथे राहतात. १८ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना विजय पॉल नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने कुलाबा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. तिथे दुसऱ्या एका व्यक्तीने आपली ओळख कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.के. जयस्वाल अशी करून दिली. कॉल करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदार महिलेवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला. त्यांच्या आधार कार्डाच्या तपशीलांचा वापर करून कॅनरा बँकेत खाते उघडून त्यातून ६ कोटींचा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा दावा या भामट्यांनी केला. या महिलेवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा(प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कधीही अटक होऊ शकते, असे सांगून घाबरवले. तक्रारदार महिलेने असे कोणतेही खाते उघडले नसल्याचे वारंवार सांगितले. तरीही सायबर भामट्यांनी त्यांना ‘नरेश गोयल’ नावाच्या एका उच्चभ्रू व्यावसायिकाबरोबर त्याही पोलिसांच्या रडारवर आहेत असे सांगितले. पूर्ण सहकार्य केले तरच अटक टाळता येईल, असे पटवून दिले. याशिवाय ही बाब कोणालाही सांगू नये असे बजावले आणि तपासणीसाठी त्यांच्या सर्व बँक खात्यांचे तपशील देण्याची मागणी केली.

बनावट न्यायायाल, बनावट सुनावणी

महिला जाळ्यात फसल्यावर सायबर भामट्यांनी एक बनावट ‘ऑनलाइन सुनावणी’ आयोजित केली, जिथे ‘चंद्रचूड’ नावाचा न्यायाधीश समोर बसला होता. त्या न्यायाधीशाने त्यांचा जामीन फेटाळल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार महिला अधिकार घाबरली. सायबर भामट्यांनी मग त्यांना या प्रकऱणाताून सोडविण्यासाठी पैशांची मागणी केली. तक्रारदारल महिलेने आपल्या विविध बॅंक खात्यातून ३ कोटी ७१ लाख रुपये हस्तांतरीत केले.

पुन्हा पैशांची मागणी

जवळपास पावणे चार कोटी दिल्यानंतर आपली सुटका झाली असे या महिलेला वाटले होते. मात्र पैसे मिळाल्यानंतर काही काळाने सायबर भामट्यांनी पुन्हा संपर्क साधून आणखी पैशांची मागणी केली, अन्यथा अटक केली जाईल धमकी दिली. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस गाठले. या अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.