उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याविरोधात बीडमधून निवडणूक लढविण्याचे आव्हान ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी दिले. तेच सर्वात योग्य उमेदवार असून माझ्याविरोधात ज्या मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे, त्यातील जयदत्त क्षीरसागर वगळता अन्य नेते आमच्याच पक्षाच्या मांडवाखालून गेलेले आहेत, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार बीडमधूनही लढू शकतील किंवा त्यांची तशी तयारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, पवार यांनी बीडमधून लढूनच दाखवावे, असे आव्हान मुंडे यांनी दिले. ते माझ्याविरोधात उभे राहिले, तरी त्यांनाच बीडमध्ये अडकून पडावे लागेल आणि मतदारसंघात माझे काम असल्याने मी महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरू शकेन, असे त्यांनी सांगितले. सरकारविरोधात जनतेमध्ये इतका तीव्र असंतोष आहे, की मंत्र्यांना निवडणुकीत पाडणे सहज शक्य आहे. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळुंके आदींची नावे माझ्याविरोधात रोज पुढे येत आहेत. पण मी या सर्वाना ओळखून आहे, असे त्यांनी नमूद केले.