मुंबई : मानखुर्द टी जंक्शनलगतच्या महाराष्ट्र नगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला महानगरपालिकेने अखेर सुरुवात केली असून या भुयारी मार्गातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच, भुयारी मार्गावर छत बसवून रंगरंगोटीचीही कामे केली जाणार आहेत. अनेक वर्षांपासून या भुयारी मार्गातून खड्डे चुकवत, चिखल तुडवत रहिवाशांना ये-जा करावी लागत होती. वारंवार मागणी करूनही भुयारी मार्गाचे दुरुस्तीकाम रखडले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शीव – पनवेल महामार्गावरील मानखुर्द टी जंक्शन परिसरातून पलीकडे महाराष्ट्र नगरात जाण्यासाठी सुमारे २५ वर्षांपूर्वी दोन पदरी भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. भुयारी मार्गावरून रेल्वे जात असून नागरिकांना या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. मात्र, काही महिन्यांपूर्वी मेट्रो प्रशासनाने रेल्वे मार्गावर पादचारी पूल बांधल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून या भुयारी मार्गाची दूरवस्था झाली असून डागडुजीअभावी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महाराष्ट्र नगरात अनेक इमारती, झोपड्या असल्याने या परिसरात नागरिक आणि वाहनांची कायम वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी अनेक वेळा भुयारी मार्गात खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. भुयारी मार्गात दिव्यांसाठी सुविधा नसल्याने काळोखातूनच नागरिकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ही समस्या आणखी जटिल होते.

हेही वाचा…गॅस वाहिनी तुटल्याने चेंबूरमधील ७२ कुटुंबियांवर चार दिवसांपासून उपासमार

पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा नसल्याने दोन्ही भुयारी मार्ग जलमय होतात. नागरिकांना नाईलाजाने रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्यानंतरही भुयारी मार्गाच्या डागडुजीला मुहूर्त मिळाला नव्हता. निवडणुकीपूर्वी या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. आता महापालिकेने भुयारी मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासह रंगरंगोटी करून भुयारी मार्ग सुशोभित केला जाईल. तसेच, भुयारी मार्गावर छतही बसविण्यात येणार आहे.

हेही वाचा…अमेरिकन वकिलातीत बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा

या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यांनतर दोन – तीन दिवसांपूर्वी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. येत्या ३ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, येथील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporation started repairing of subway connecting maharashtra nagar near mankhurd t junction mumbai print news sud 02