मुंबई : मीरा-भाईंदर येथील काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने बुधवारी चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मे २०१० मध्ये पाटील यांची हत्या करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबईत वर्ग केले होते.
अजय पांडे, गुलाम रसूल, विशाल म्हात्रे आणि राजेश सिंग या चार जणांना सत्र न्यायालयाने मंगळवारी पाटील यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी बुधवारी या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या आधी चारही आरोपींनी कुटुंबाचा हवाला देत कमी शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
एखाद-दुसरा साक्षीदार वगळता प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार फितूर झाले होते. परंतु तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्या आधारे न्यायालयाने या चारही आरोपींना पाटील यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप सुनावली.
पोलिसांच्या आरोपानुसार, भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयाच्या संकुलात पाटील यांची हत्या करण्यात आली. रसूल याने पाटील यांना २७ वेळा भोसकले. तर पांडे यांनी त्यांच्यावर दोन वेळा गोळ्या झाडल्या. हे महाविद्यालय पाटील यांच्या ट्रस्टतर्फे चालवण्यात येत होते. म्हात्रे याच्या सांगण्यावरून आरोपी सिंग याने पाटील यांच्या हत्येचा कट रचला होता. पाटील आणि सिंग यांच्यात व्यवसाय आणि राजकारण यावरून शत्रुत्व होते. त्यामधूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. हे प्रकरण ठाणे सत्र न्यायालयात चालवण्यात आले. तर आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतील तसेच पुरावे नष्ट करतील, अशी भीती व्यक्त करत पाटील यांच्या पत्नी आणि नगरसेवक संध्या पाटील यांनी हे प्रकरण मुंबई सत्र न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. संध्या यांच्या वतीने अॅड्. महेश मुळे यांनी हस्तक्षेप अर्ज न्यायालयात केला होता. या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून राजा ठाकरे यांनी बाजू मांडली.
