खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा मार्डचा इशारा

हेमंत पाटील यांनी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा केंद्रीय मार्डकडून देण्यात आला आहे.

mp hemant patil, mp hemant patil misbehave with dean, nanded dean, mard, Maharashtra State Association of Resident Doctors
खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन…'मार्ड'चा इशारा (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये २४ तासांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांबरोबर गैरवर्तन करून प्रसारमाध्यमांसमोर त्यांना स्वच्छतागृह साफ करण्यास भाग पाडले. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने या घटनेचा तीव्र निषेध करत खासदार पाटील यांनी माफी मागावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. यामुळे कोलमडणाऱ्या रुग्णसेवेला पूर्णत: शासन जबाबदार असेल, असा इशाराही ‘मार्ड’ने दिला आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेल्या २४ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय मार्डने रुग्णालयातील अनेक विभागांच्या निवासी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली. या घटनेला अनेक बाबी कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये वैद्यकीय शिक्षकांची कमतरता, वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांची कमतरता, वैद्यकीय सेवक, एकूण मनुष्यबळ, जीवरक्षक औषधे आणि संसाधने यांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. असे असतानाही निवासी डॉक्टर वैद्यकीय शिक्षक हे आपले सर्वस्व पणाला लावून रुग्णसेवा करत आहेत.

हेही वाचा : मनसेचा ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप; “मुंबईत गुजराती भाषेची जबरदस्ती सहन करणार नाही” म्हणत दिला इशारा!

औषधे व अत्यावश्यक संसाधनाचा तुटवडा हा फक्त नांदेड रुग्णालयापुरता मर्यादित नसून तो राज्यातील उर्वरित रुग्णालयांमध्येही आहे. याचा विचार न करता हेमंत पाटील यांनी नांदेड रुग्णालयाच्या अधिष्ठातांना शिवीगाळ करून गैरवर्तन करत त्यांना अपमानित केले. तसेच त्यांना जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांसमोर महाविद्यालयाच्या आवारातील स्वच्छतागृहे साफ करण्यास भाग पाडले. घटनेचे मूळ कारण शोधण्यासाठी योग्य तपासाची वाट न पाहता अधिष्ठात्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा केंद्रीय मार्डकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. तसेच हेमंत पाटील यांनी शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा केंद्रीय मार्डकडून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास त्याला पूर्णत: शासन जबाबदार असेल, असेही ‘मार्ड’ने स्पष्ट केले.

हेही वाचा : खासगी इमारतींच्या पुनर्विकासातील विरोधकांना तूर्तास अभय!

प्रशासनाच्या अपयशाचे डॉक्टरांना बळी बनवू नका

रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांना जबाबदार धरण्यात येत आहे. तसेच हिन वागणूक देऊन त्यांचा अपमान करण्यात येत असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक निराश झाले आहेत. तसेच घटनेनंतर समस्त डॉक्टरही हताश झाले आहेत. प्रशासनाच्या अपयशासाठी डॉक्टरांना बळीचा बकरा बनवण्याऐवजी राज्यभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीवरक्षक औषधे, संसाधने आणि मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी विनंती ‘मार्ड’कडून करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nanded mard warned mp hemant patil to apologize dean for misbehave or face statewide agitation from doctors mumbai print news css

First published on: 04-10-2023 at 13:55 IST
Next Story
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…