मुंबई- सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह सुरू आहे. नवरात्रोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहाने भारलेला सण आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या मुख्यालयात आगळावेगळा नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. गुन्हे शाखेच्या कार्यालयात असलेल्या देवीच्या पंचधातूच्या मूर्तीची ९ दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते. गेल्या अनेक वर्षापासून हा सण साधेपणाने पण भक्तीभावाने साजरा केला जात आहे.
नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या उपासनेसाठी साजरा केला जाणारा महत्त्वाचा हिंदू सण आहे. नवरात्र” म्हणजे नऊ रात्री. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात उपवास, जागरण, गरबा, दांडिया, भजन-कीर्तन आणि देवीची आराधना केली जाते. दहाव्या दिवशी दसरा किंवा विजयादशमी साजरी केली जाते, जी चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवते. भारतभर या सणाचे वेगवेगळ्या परंपरांनुसार रूप दिसते. महाराष्ट्रात घरोघरी देवीची स्थापना, गुजरातमध्ये दांडिया-गरबा, तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. असा श्रध्दा आणि भक्तीचा संगम असलेल्या सण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फेही साजरा केला जातो. पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या गुन्हे शाखेच्या जुन्या इमारतीत ९ दिवस हा नवरात्रोत्सव सण सुरू असतो. हा सण साजरा करण्यामागची कथाही रंजक आहे.
१९९१ पासून देवी पूजनाला सुरुवात
मुंबईत १९८९ साली मुंबईत एक चोरी झाली होती. चोरांनी घरातींल इतर मौल्यवान साहित्यासह साडेतीन फूट उंचीची पंचधातूची मूर्तीही चोरली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने या चोरीचा छडा लावला आणि सर्व साहित्य परत मिळवले. त्यात ही मूर्ती देखील होती. ही मूर्ती अत्यंत भक्कम आणि वजनदार आहे. काही काळ ती पोलिसांच्या भांडारखान्यात ठेवण्यात आली होती. गुन्हे शाखेत या देवीच्या मूर्तीच्या पूजनाला कशी सुरवात झाली त्याच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. ज्याच्या घरातून ही मूर्ती चोरी झाली होती त्या तक्रारदारानेच ही मूर्ती मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जाते. एका पोलीस अधिकाऱ्याच्या स्वप्नात या देवीच्या मूर्तीचे दर्शन झाले आणि १९९०-९१ च्या दरम्यान मूर्ती बाहेर काढून पूजनास सुरुवात झाली, असेही जुने पोलीस सांगतात. या देवीबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी ती अत्यंत शक्तिशाली असल्याचा विश्वास पोलीस दलात आहे. ही मूर्ती तब्बल ३५ वर्षांपूर्वी गुन्हे शाखेकडे आली होती. २००४ पासून नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीची विधिवत पूजा केली जाते. यावेळी येणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रसाद रूपाने जेवण दिले जाते. गुन्हे शाखेतील अधिकारी एखाद्या महत्त्वाच्या तपासाला सुरुवात करण्याआधी देवीचे आशीर्वाद घेतात, अशी चर्चा आहे.
निवृत्त अधिकारीही दर्शनाला
आजही काही निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी देवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्राव्यतिरिक्तही वर्षभर गुन्हे शाखेच्या प्रशासकीय विभागात देवीची प्रतिष्ठापना केलेली असते.
जुन्या इमारती मधील शेवटचा नवरात्रोत्सव
मात्र, यंदाचा नवरात्रोत्सव हा या जुन्या इमारतीतील शेवटचा उत्सव ठरणार आहे. लवकरच ही पंचधातूची मूर्ती गुन्हे शाखेच्या जुन्या इमारतीतून हलवून पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीत स्थलांतरीत केली जाणार आहे. कारण जुनी इमारत तोडली जाणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या नवरात्र पूजनाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे.