राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं बुधवारी अटक केल्यानंतर राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्या घरी सकाळी ईडीनं धाड टाकली होती. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणून अटक करण्यात आली. नवाब मलिक यांना सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आलं असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, आज नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली.

दरम्यान, आज नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्यांनी पोटात दुखत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवाब मलिक मंत्रीपदावर असल्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर देखरेख करत असून जे जे रुग्णालयाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.

मलिकांवर आरोप काय?

दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप आह़े 

मुनीरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये मुनीरा व त्यांच्या आईच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. त्यावेळी त्या सात वर्षांच्या होत्या. त्या जमिनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचा. मुनीरा या प्रौढ झाल्यानंतर त्यांनी रेहमान नावाच्या एका व्यक्तीला व्यवस्थापक म्हणून ठेवले. त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये मुनीरा या मालमत्तेच्या एकटय़ा वारसदार बनल्या. त्यावेळी मे. सॉलिड्स इंडस्ट्रीजचे मालक पटेल त्यांच्याकडे यायचे. त्यांची दोन गोदामे (शेड) या जमिनीवर होती. त्यांनी भाडे रकमेचा धनादेश मुनीरा यांना दिला. जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनीरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. मात्र, या मालमत्तांच्या विक्रीचे अधिकार कोणालाही देण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर जमिनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली, त्यांच्याकडून नवाब मलिक यांना कंपनीची आणि जमिनीची मालकी कशी मिळाली याबाबत काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी ‘ईडी’ला जबाबात सांगितले.

नवाब मलिकांच्या घरी नेमकं घडलं काय? मुलगी निलोफर यांनी केला खुलासा; म्हणाल्या, “सकाळी ६ वाजता…”

या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान याने प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना पारकरचा चालक होता. याप्रकरणी ‘ईडी’ने खानचा जबाबही नोंदवला आहे. नवाब मलिक व हसिना पारकर यांनी जमिनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनीरा यांना धमकावण्यातही आल्याचा आरोप असून, त्यासाठी सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबीय या जागेचे भाडेकरू झाले. ती जागा सलीम पटेलकडील ‘पॉवर ऑप अ‍ॅटर्नीच्या माध्यमातून मालकीची करण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली, असे सरदार खान याने जबाबात म्हटले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात बैठका झाल्या, त्यावेळी आपणही उपस्थित असल्याचा दावा यावेळी खानने त्याच्या जबाबात केला. या जागेवर मलिक यांचे दुकानही होते, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे. या जमिनीची किंमत खरेदी खतानुसार तीन कोटी ३० लाख रुपये होती. त्यातील केवळ १५ लाख रुपये मलिक यांच्याकडून भरण्यात आले. या सर्व व्यवहारासाठी तोतया भाडेकरू उभे करण्यात आले, असा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawab malik admitted to j j hospital due to health issue arrest by ed inquiry pmw