महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मनी लॉन्डिरग प्रकरणात महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीतून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिकांना सात मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ते कोठडीत आहेत.
ईडीच्या मागणीनंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये नवाब मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही. तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे असे ईडीतर्फे सांगण्यात आले. या मुद्द्यावरुन न्यायालयाने सात मार्चपर्यंत नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे.
ईडीकडून सहा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. आरोपीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ईडीने पूर्ण चौकशी केली नाही, असे ईडीतर्फे सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नवाब मलिकला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे निर्देश दिले. ईडीच्यावतीने अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला, तर नवाब मलिक यांच्या वतीने अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी युक्तिवाद केला.
याआधी सुनावणीदरम्यान अनिल सिंह म्हणाले की, “आम्ही हसीना पारकर यांच्या मुलाचा जबाब कोर्टात दिला आहे. त्याशिवाय तुरुंगात असलेल्या आरोपीचा जबाबही कोर्टात सोपवण्यात आले आहे. ही माहिती आम्ही आत्ता सर्वांना सांगू शकत नाही. मनी लॉन्डिरग प्रकरणात अनेकांच्या चौकशीबरोबरच व्यवहाराची माहिती आणि तपास करावा लागणार आहे. यात कोणाचा सहभाग आहे, काही पैसे मूळ मालकाला दिलेले नाहीत, अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत, अशी नवीन माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सहा दिवस कोठडीची गरज आहे.”
५५ लाख रुपयांची बाब ही टायपिंग मिस्टेक
यावर नवाब मलिक यांची बाजू मांडणारे अधिवक्ता अमित देसाई म्हणाले की, “आम्ही या प्रकरणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कोठडी अर्ज वाचून, गेल्या सुनावणीच्या वेळी मी जे बोललो होतो ते खरे असल्याचे सिद्ध होत आहे. आता फक्त न्यायालयाने त्यांना जामीन द्यायचा की नाही हे ठरवायचे आहे. नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड टोळीचे संबंध असल्याचे ईडीने गेल्या वेळी न्यायालयात सांगितले होते. तेव्हा त्यांचा टेरर फंडिंगमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे सांगण्यात आले होते. हसीना पारकरला ५५ लाख रुपये दिल्याचा आरोप करून त्याला टेरर फंड म्हटले होते. पण आज ईडीच्या अर्जात काय म्हटले आहे ते पाहा. आज ईडी म्हणते की मागच्या वेळी ५५ लाख रुपयांची बाब ही टायपिंग मिस्टेक होती आणि ती फक्त पाच लाख रुपये आहे. मात्र या अर्जाच्या आधारे ईडीच्या कोठडीत पाठवलेल्या व्यक्तीला अटक करण्यापूर्वी २० वेळा विचार करावा, सर्व तथ्ये गोळा केल्यानंतर कोणतीही कारवाई करावी. ईडीला गृहपाठ करणे आवश्यक आहे.”
दरम्यान, नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली. चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली.