मानहानीच्या खटल्यांनतर ज्ञानदेव वानखेडेंची आणखी एक तक्रार; नवाब मलिक कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता

वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना मंगळवारी उत्तर दाखल करायचे आहे.

Ncb sameer wankhede dhyandev wankhede filed complaint against nawab malik sc st act
(संग्रहित छायाचित्र)

आर्यन खान प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर दररोज वेगवेगळे आरोप करून घेरणारे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आता कायदेशीर लढाईत अडकल्याचे दिसत आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एसी-एसटी कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली असून एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. याआधी वानखेडे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला असून त्यावर त्यांना मंगळवारी उत्तर दाखल करायचे आहे.

एएनआय वृत्तानुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी ओशिवारा सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत आरोप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी कुटुंबाच्या जातीबाबत खोटे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मलिक यांच्यावर एफआयआर नोंदवावा, अशी वानखेडे कुटुंबीयांची मागणी आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी उच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मंगळवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली. या वेळी न्यायालयाने मलिक यांना वानखेडे कुटुंबीयांबाबत कोणतेही वक्तव्य करण्यापासून मज्जाव करणारा आदेश मात्र दिला नाही.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात १.२५ कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. तसेच मलिक यांना आमच्या कुटुंबाबद्दल, त्यातील सदस्यांबाबत प्रसारमाध्यमात वक्तव्य करण्यापासून, लिहिण्यापासून कायमस्वरूपी मज्जाव करण्याची मागणी वानखेडे यांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झालेला मजकूर हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सोमवारी वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी मलिक यांच्या वतीने अ‍ॅड्. अतुल दामले यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. तसेच याचिकाकर्ते त्यांच्या सज्ञान मुलांच्या वतीने बोलू शकत नाही. इतरांच्या समाजमाध्यमावरील वक्तव्यासाठी मलिक यांना जबाबदार धरता येणार नसल्याचा दावाही केला. त्यावर न्यायालयाने मलिक यांना मंगळवापर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती जामदार म्हणाले, तुम्ही (मलिक) उद्यापर्यंत उत्तर दाखल करा. आपण ट्विटवर उत्तर देऊ शकत असल्यास, आपण येथे देखील उत्तर देऊ शकता. मलिक यांना फिर्यादी (ज्ञानदेव वानखेडे) विरुद्ध कोणतेही विधान करण्यापासून रोखणारा आदेश जारी न करता त्यांनी हे निर्देश दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncb sameer wankhede dhyandev wankhede filed complaint against nawab malik sc st act abn

Next Story
संपकऱ्यांवर कारवाई ? ; अवमान याचिका दाखल करण्याची न्यायालयाची एसटी महामंडळाला सूचना
फोटो गॅलरी