आरोप-प्रत्यारोप आणि कोर्टबाजीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ठाणे महापालिकेवर बरखास्तीची कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलेला असतानाच महापालिकेतील सत्ताकारण मात्र शनिवारी विकोपास गेले. स्थायी समिती सभापतीपदासाठी येत्या ९ मे रोजी महापौरांनी बोलाविलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करावी आणि महापौरांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. त्यावर या प्रकरणाची चौकशी करून महापौर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिल्याने हा वाद अधिक पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतानाही शिवेसनेच्या मनमानी कारभाराला लगाम घातला जाणार नसेल तर आमचे सामुहिक राजीनामे घ्या अशी संतप्त भूमिका कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे कळते.
 आघाडीच्या ताब्यातील तिजोरीच्या चाव्या काढून घेण्यासाठी शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यातूनच नवा वाद उफाळून आला आहे.
स्थायी समितीवरील आघाडीची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी सभापतीपदाची निवडणूक घेण्याची मागणी शिवसेनेने काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांकडे केली होती. तर विद्यमान सभापती रविंद्र फाटक यांचा कार्यकाल ऑक्टोबपर्यंत असून तोवर निवडणूक घेता येणार नाही अशी भूमिका आघाडीने घेतली आहे.
या वादावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी राज्यशासनाचा अभिप्राय मागितलेला असतानाच महापौर एच.एस. पाटील यांनी स्थायी समिती सभापतीच्या निवडीसाठी येत्या ९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली असून ही नियमबाह्य सभा रद्द करावी अशी मागणी आघाडीच्या नगरसवेकांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे केली.
तसेच महापौरांनी बेकायदेशीरपणे ही सभा बोलाविल्यामुळे त्यांच्यावर कठोर करवाई करावी तसेच आघाडीचे सरकार असतानाही शिवेसनेच्या मनमानी कारभाराला लगाम घातला जाणार नसेल तर आमचे सामुहिक राजीनामे घ्या अशी भूमिका संतप्त नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे कळते.