मुंबई : शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर मंगळवारपासून एकानंतर एक शिवसेना आमदार शिंदे गटात जाऊन दाखल होत आहे. गुरुवारी शिवसेनेचे पाच आमदार गुवाहाटी दाखल झाल्यानंतर शिंदे गटाने आपल्याकडे आलेल्या शिवसेनेच्या ३७ आमदारांची आणि नऊ अपक्ष आमदारांची यादी जाहीर केली होती.  शुक्रवारी शिवसेनेचे आणखी एक आमदार दिलीप लांडे गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे आता गुवाहाटीत शिंदे यांच्या सोबत असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३८ झाली आहे तर नऊ अपक्षांसह एकूण ४७ आमदार सध्या शिंदे यांच्यासोबत आहेत.

या सर्व घडामोडी नंतर शुक्रवारी आपल्याला आवश्यक असलेले संख्याबळ पूर्ण झाले असल्याचा आणि शिवसेना विधिमंडळ पक्षात हवे असलेले बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. पण त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. आमच्या आमदारांची बैठक होईल आणि त्याच्या पुढील दिशा ठरवली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र मुंबईत कधी येणार यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.

 शिवसेनेने बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींवरही त्यांनी पुन्हा टीका केली. आमदारांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ शिवसेनेकडे नाही त्यामुळे ही कारवाई अवैध असल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. त्याचबरोबर शिवसेनेने काही कारवाई केल्यास त्यास न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे.

भाजपबाबतच्या विधानावरून घूमजाव

आपल्या पाठीशी राष्ट्रीय पक्ष आहे ती एक महान शक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला आहे. आपल्या सर्वाना काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असा शब्द त्यांनी मला दिला आहे, असे विधान एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आपल्या गटाचे आमदारांच्या बैठकीत केले होते. त्यातून भाजप शिंदे गटाच्या बंडामागे असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही राष्ट्रीय पक्ष आपल्या गटाचा संबंध नसल्याचे विधान करत घूमजाव केले.

आमदार स्वगृही जाण्याची भीती?; पुरेसे संख्याबळ असतानाही अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत

मुंबई : पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ नये यासाठी आवश्यक असे  दोन-तृतीयांश आमदारांचे पाठबळ लाभले तरी एकनाथ शिंदे  यांनी अद्याप पुढील पावले अद्याप टाकलेली नाहीत. बरोबर असलेल्या आमदारांबद्दल खात्री नाही की शिवसेनेचे अजून आमदार फुटण्याची ते वाट बघत आहेत का, अशी चर्चा सुरू झाली.  

पक्षांतर बंदी कायद्यानुसार कोणत्याही पक्षाच्या आमदारांमध्ये वैध फूट पडण्यासाठी दोन-तृतीयांश आमदारांचे संख्याबळ असणे बंधनकारक असते. त्यापेक्षा एक जरी आमदार कमी असला तरी सर्व आमदारांवर मूळ पक्ष अपात्रतेची कारवाई करू शकते. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ सध्या ५५ आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार बंडखोर आमदारांच्या गटाकडे ३७ आमदार असणे आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शिवसेनेचे एकूण ३८ आमदार गुवाहाटीमध्ये शिंदे यांच्यासोबत आहेत. म्हणजेच विधिमंडळात येऊन संख्याबळ सिद्ध करणे एकनाथ शिंदे यांना शक्य आहे.

मात्र तरीही एकनाथ शिंदे गट मुंबईत न येता अद्याप महाराष्ट्र बाहेरच मुक्काम ठोकून आहे. त्यांच्या या धोरणाबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. लगेच मुंबईत आल्यास आपल्या गटातील काही आमदार फुटून परत शिवसेनेत जातील अशी त्यांना भीती आहे का, अशी शंका व्यक्त करण्यात येते.  आफल्याला महाशक्तीचा पाठिंबा असल्याचे विधान शिंदे यांनी केले होते. या बंडामागे असलेली महाशक्ती शिंदे यांच्या गटाचे निर्णय घेत असून ती महाशक्ती ठरवेल त्यानुसारच हालचाली करणे शिंदे यांना भाग आहे. त्यामुळे ती महाशक्ती ठरवेल तेव्हाच शिंदे  हे राज्यपालांकडे पत्र सादर करतील वा मुंबईत परततील, असे बोलले जाते. 

शिंदे यांच्या विलंबाबद्दल आणखी एक शक्यता व्यक्त होत आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उभारल्यानंतर रोज शिवसेनेचे काही आमदार शिंदे गटात दाखल होत आहेत. काही दिवस थांबल्यास आणखी पाच दहा आमदार आपल्या गटात येऊ शकतील असा शिंदे गटाची रणनीती आहे का, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Necessary numbers are complete eknath shinde claims ysh
First published on: 25-06-2022 at 01:47 IST