मुंबई : माहीम येथील मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करून पालिका प्रशासनाने शाळा बंद केली असून लवकरच शाळेचे पाडकाम करण्यात येणार आहे. मात्र, शाळा संरचनात्मकदृष्ट्या मजबूत असल्याचा दावा पालक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. ही शाळा वाचवण्यासाठी स्वातंत्र्यदिनी विविध नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी एकत्र आले. तसेच, शाळेमागील मैदानात ध्वजारोहण करून शाळा वाचविण्याचा सर्वांनी निर्धार केला.

न्यू माहीम शाळेचे सुमारे सात – आठ वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. त्यामुळे अल्पावधीतच शाळा धोकादायक असल्याचे घोषित केल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. तसेच, यासंदर्भात शाळेबाहेर कोणतीही नोटीस लावण्यात आलेली नाही. या शाळेत शिकणाऱ्या मराठी, हिंदी, कन्नड आदी माध्यमांतील शेकडो विद्यार्थ्यांचे दूरच्या अन्य शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड पायपीट करावी लागत आहे. याच परिसरातील पालिकेच्या मोरी रोड माहीम शाळेची इमारत पुनर्बांधणीच्या नावाखाली तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आली. मात्र, अद्याप तिचे बांधकाम झालेले नाही. त्यामुळे न्यू माहीम शाळाही कोणाच्या तरी हितासाठी पाडण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. अनेक प्रयत्न करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने स्वातंत्र्यदिनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी, तसेच शाळा वाचविण्यासाठी अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. न्यू माहीम शाळेमागील क्रीडांगणात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मोहन जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनतर, उपस्थित सर्वांनी शाळा वाचविण्याचा निर्धार केला.

दरम्यान, शाळा ही संस्कृती असून ती लोप पावल्यास देश संकटात येईल. कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी क्रीडांगणे, शाळा, उद्याने महत्त्वाची भूमिका बजावतात. या गोष्टींचे अस्तित्व धोक्यात आल्यास समाजात त्याचे दुष्परिणाम दिसतील. त्यामुळे या गोष्टी सुरक्षित राहायला हव्यात, असे ठाम मत सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत यांनी व्यक्त केले. तसेच, माहीम येथील शाळा मोक्याच्या ठिकाण असून तिचा गैरवापर करू नका, असाही इशारा त्यांनी दिला. तसेच, शाळा वाचविण्यासाठी शांततेच्या मार्गाने लढा सुरू करण्यात आला आहे. भविष्यात हा लढा असाच सुरू ठेवावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिवाकर पारकर यांनी केले. स्वातंत्र्यसैनिकांनी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने मिळवून दिलेल्या सार्वजनिक जमिनी व शाळांवर विकासकांचा डोळा असल्याचा आरोप सर्वोदयी कार्यकर्ते जयंत दिवाण यांनी केला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान मच्छीवाला, सरस्वती विद्यामंदिरचे विश्वस्त आत्माराम साखरदंडे, ग्रंथाली चळवळीचे सुधीर हेगिष्टे आदी उपस्थित होते.