महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आर्थिक ताकदीवर लगेच कर्जमाफी जाहीर करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असून शिवसेनेसह विरोधकांकडून त्यांची कोंडी केली जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कर्जमाफीची पुन्हा केली असून ३१ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३० हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारला उचलावा लागणार आहे. पण सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस केवळ अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केवळ ३० टक्के वाटा उचलण्यास तयार असल्याचे समजते. शिवसेनाही कर्जमाफीसाठी आक्रमक होणार असून कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलेले विरोधक, स्वाभिमानी संघटना आणि शेतकरी करणार असलेला ‘संप’ यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. सर्वपक्षीय आक्रमक असल्याने विधिमंडळाचे कामकाज या मुद्दय़ावर ठप्प होण्याची चिन्हे आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पडसाद व चर्चा देशभरात सुरु असतानाच महाराष्ट्रातही त्यावरुन राजकीय वादळ निर्माण होणार असून कर्जमाफीसाठी दिवसेंदिवस मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे. राज्याची नाजूक आर्थिक स्थिती, चार लाख १३ हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा या पाश्र्वभूमीवर केवळ राज्य सरकारच्या िहमतीवर कर्जमाफी देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोध आहे किंवा ते तयार नाहीत. केंद्र सरकारकडून अधिकाधिक मदत मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा, मग केंद्र सरकार विचार करेल, एवढेच आश्वासन मिळाले आहे. शिवसेनेसह विरोधी पक्ष कर्जमाफीसाठी आक्रमक असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजूनही केंद्र सरकारला कोणताही ठोस प्रस्ताव पाठविलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. या प्रक्रियेला विलंब लावून ती पुढील काही महिने सुरु ठेवली जाणार आहे.

सरसकट  कर्जमाफी देण्यापेक्षा दोन हेक्टपर्यंत जमीन असलेल्या अल्प भू धारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास राज्य सरकार अनुकूल आहे. त्यामुळे त्यांच्या कर्जमाफीसाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ३० टक्के हिस्सा केंद्र व राज्य सरकारने उचलावा आणि ४० टक्के वाटा बँकांनी उचलावा, असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र त्यास बँका व केंद्र सरकारने त्यास मंजुरी दिलेली नसून राज्य सरकारने अजून प्रस्तावच पाठविलेला नाही. मध्यावधी निवडणुका घेतल्यास त्याआधी किंवा २०१९ च्या निवडणुकांआधी  लाभासाठी हा निर्णय जमेल तितका पुढे ढकलावा, अशी भाजपची खेळी आहे.

उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी पुन्हा केली आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन म्हणजे पोकळ नसून ते पहिल्याच बैठकीत पूर्ण करणे अभिमानास्पद आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही शिवसेनेची मागणी कायम आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट

राज्यात कर्जमाफीसाठी दबाव

  • शेतकरी खातेदारांची संख्या – एक कोटी ३६ लाख ४२ हजार
  • ३१ लाख ५७ हजार शेतकऱ्यांकडे थकबाकी
  • ३० हजार ५०० कोटी रुपयांची कर्जाची थकबाकी
  • महाराष्ट्रात दोन हेक्टर पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या – एक कोटी सात लाख ६१ हजार
  • एक हेक्टपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ६७ लाख