उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत

तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून गेल्या दोन वर्षांत घालण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत
संग्रहित छायाचित्र

मुंबई : तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून गेल्या दोन वर्षांत घालण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येणार आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींसाठी यावर्षी अपवादात्मक परिस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करावे लागणार असून या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमुद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे मुंबईत टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे सण, उत्सव साजरे करता आले नाहीत. करोनाची चौथी लाट ओसरत असून यापार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा होणार याबाबत उस्तूकता होती. यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे सावट नसले तरी पीओपीच्या मूर्तींवर बंधन घालण्यात आले होते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकारांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केली होती. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी गणेशोत्सव समिती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकारांच्या संघटनांचे प्रतिनिधी आदींची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ‘परिमंडळ – २ चे उप आयुक्त गणेशोत्सव समन्वयक’ हर्षद काळे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी व ‘पी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह मुंबई पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी – प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांचे आणि संबंधित खात्यांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) घडविलेल्या गणेशमूर्तीची विक्री अथवा वापरावर बंदी आहे. तसेच पीओपीची मूर्ती विसर्जनामुळे जल प्रदुषण होत असून ते पाण्यात विरघळत नाही. अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच पीओपीच्या मूर्तींवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदुषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात पीओपीपासून घडवलेल्या गणेशमूर्तीची विक्री अथवा खरेदी करू नये, त्याऐवजी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मात्र या बैठकीत सार्वजनिक मंडळांनी पीओपीच्या गणेशमूर्तींना किमान यावर्षी परवानगी देण्याची मागणी केली होती. मुर्तिकारांकडे अद्याप मूर्तींसाठी पर्यायी माध्यमाची तयारी नाही, तसेच शाडूच्या मातीच्या मूर्ती जड असतात. त्यापासून मोठ्या मूर्ती तयार करता येणार नाहीत. तसेच अनेक मूर्तिकारांनी मूर्ती तयार केल्या असून किमान यावर्षी सूट द्यावी अशी मागणी मूर्तिकारांनी व मंडळांनी केली होती. त्यामुळे यावर्षी पीओपीच्या मूर्तींना परवानगी देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

करोना वाढल्यास पुन्हा निर्बंध

यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. कार्यकर्त्यांच्या संख्येवर व भक्तांना दर्शन देण्याबाबत कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. मात्र गणेशोत्सवापर्यंत करोना वाढल्यास पुन्हा निर्बंध घातले जाऊ शकतील, असाही इशारा प्रशासनातर्फे यावेळी देण्यात आला.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असणार आहे. तसेच या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे, जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्यांना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची गणेशमूर्ती ओळखणे सुलभ होईल

हर्षद काळे, उपायुक्त, परिमंडळ दोन

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“आता मी मुख्यमंत्री, ‘तपासून सादर करा’ ही लिखापडी बंद, थेट जिल्हाधिकाऱ्यांना…”; एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी