मुंबई : मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील फरारी आरोपी टायगर मेमन याच्या नातेवाईकांनी कुर्ला येथील दोन घरे तपास यंत्रणांनी जप्त करण्याच्या कारवाईविरोधात केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. आपण या घरांचे मालक असल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी ही घरे जप्त करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखण्याची मागणी केली होती,
कुर्ला पूर्व येथील बाग-ए-रहमत सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये ही दोन घरे असून ती तस्करी विरोधी आणि विदेशी चलन अफरातफर (मालमत्तेची जप्ती) कायद्यांतर्गत (सफेमा) जप्त करण्यात आली होती. टायगर मेमनचे पालक अब्दुल रझाक आणि हनीफा मेमन यांच्या मालकीची ही घरे ७७ वर्षांच्या झैबुनिस्सा इब्राहिम खान आणि तिच्या मृत पतीला विकण्यात आली होती. त्यासाठी आपण बँक व्यवहारांद्वारे ६.७५ लाख रुपये दिले होते. दोन्ही घरे गेल्या ३३ वर्षांपासून आपल्या ताब्यात असून त्यांचा देखभाल खर्च आणि उपयुक्तता शुल्क नियमितपणे भरत असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. घर खरेदीशी संबंधित बँकेची कागदपत्रे आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रेही आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केली होती.
सप्टेंबर १९९३ च्या जप्तीच्या आदेशापूर्वी आपल्याला त्याबाबत कोणतीही सूचना किंवा सुनावणी देण्यात आली नव्हती, असा दावा देखील याचिकाकर्त्यांनी केला होता. प्रतिवाद्यांनी मात्र याचिकाकर्त्यांच्या याचिकेला आणि मागणीला विरोध केला. तसेच, याचिकाकर्ते आणि मेमन कुटुंबीय यांच्यात घर खरेदीबाबत झालेला कोणताही नोंदणीकृत विक्री करार अस्तित्वात नाही. याचिकाकर्त्यांचे अपील यापूर्वीही फेटाळण्यात आल्याचे आणि ही बाब त्यांनी लपवल्याचेही प्रतिवाद्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. सीबीआयनेही या दाव्याचे समर्थन केले. न्यायालयानेही प्रतिवाद्यांचा युक्तिवाद मान्य करून याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली.
याचिकाकर्ते घरांचा नोंदणीकृत विक्री करार अस्तित्वात नसल्याने वैध मालकी, खरेदीदार असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. घराच्या विविध शुल्कांचा भरणा किंवा बँक कागदपत्रे सादर केल्याने घरावर मालकी हक्क मिळत नाही. मेमन कुटुंबाविरुद्धच्या पूर्वीच्या कार्यवाहीत जप्तीचा आदेश आधीच कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे, याचिकाकर्त्यांना नवीन सूचना किंवा सुनावणीसाठी अपात्र ठरवण्यात आले, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले. आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला.