भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे पर्यायी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव असला तरी शिवसेनेकडून अद्याप तसा प्रस्तावही मांडण्यात आलेला नाही वा शिवसेना भाजपच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलेल याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांना खात्री वाटत नाही. या प्रस्तावावर लगेचच घाईत निर्णय घेता येणार नाही, असे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनीही शरद  पवार यांच्याजवळ स्पष्ट केले आहे.

भाजप आणि शिवसेना यांची युती तुटेल अशी खात्री काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजूनही वाटत नाही. गेल्या वर्षी शिवसेनेने भाजप व मोदी यांच्यावर टीका करूनही ऐनवेळेला भाजपशी युती केली होती. तेव्हा तर युतीत २५ वर्षे शिवसेनेची सडली अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाषा होती. तरीही युती झाली याकडे दोन्ही काँग्रेसचे नेते लक्ष वेधतात. केंद्रात भाजपची सत्ता असताना तसेच मोदी-शहा यांच्याशी वैर पत्करण्याची धमक शिवसेना दाखविण्याची शक्यता कमीच वाटते. भाजपवर दबाव वाढविण्याकरिताच राष्ट्रवादी व काँग्रेसने पर्यायी सरकारची चर्चा सुरू केली आहे. भाजपचे महत्त्व कमी होऊन शिवसेनेकडे जास्त व चांगली खाती मिळावीत हा त्यामागचा उद्देश स्पष्ट दिसतो.

शिवसेनेला पाठिंबा देणे काँग्रेसला राजकीयदृष्टय़ा अडचणीचे आहे. यातूनच या प्रस्तावावर चर्चा करूनच निर्णय घेण्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केल्याचे समजते. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. अ‍ॅन्टोनी हे सर्व बाबींचा विचार करूच मग निर्णय घेण्याकरिता प्रसिद्ध आहेत.

भाजपच्या विरोधात पर्यायी सरकार स्थापण्याची संधी दवडली, असा संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले आहे.