माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली. तसेच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याचे समजते. बंगल्याची पाहणी केल्यानंतर पालिका कोणती भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष सुरू आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याबद्दल नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर उभयतांमधील वाद आणखी चिघळला आहे. आता शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे.

 पालिकेच्या अंधेरी येथील के-पश्चिम विभाग कार्यालयाने गुरुवारी रात्री महापालिका अधिनियम, १८८८च्या कलम ४८८ अन्वये नोटीस बजावली होती. के- पश्चिम विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास जुहू तारा रोड येथील राणे यांच्या अधिश बंगल्यात पोहचले. यावेळी राणे कुटुंबीय उपस्थित होते. पथकाने बंगल्याच्या मंजूर आराखडय़ानुसार बांधकाम झाले की नाही याची तपासणी केली. यावेळी काही बांधकामाचे मोजमापही घेण्यात आले. राणे यांचे कायदेशीर सल्लागार यावेळी उपस्थित होते. राणे कुटुंबीयांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पथकाने पडताळणी केली. 

राणे यांच्या बंगल्यात केलेल्या पाहणीअंती बांधकामाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.

 पथकाने केलेल्या पाहणीदरम्यान आढळलेल्या बाबींचा अभ्यास करण्यात येईल. तसेच बांधकामाबाबत शाहनिशा करण्यात येईल. बंगला अनधिकृत आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी ठरावीक कालावधीची गरज आहे. तसे सिद्ध झाल्यास नोटीस बजावण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.  सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन समुद्राच्या ५० मीटर क्षेत्रात हा बंगला बांधण्यात आल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पालिकेकडे केली होती. तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी पालिकेला स्मरणपत्रही पाठविले होते. त्यानुसार पालिकेने या बंगल्याची पाहणी केली.

‘मातोश्री’च्या चौघांना ईडीची नोटीस तयार

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला असून मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबद्दल राणे यांना नोटीस बजावताच ‘मातोश्री’च्या चौघांची ‘ईडी’मध्ये नोटीस तयार असल्याचा दावा राणे यांनी केला. सुशांतसिंह व दिशा सॅलियन यांची आत्महत्या नव्हे तर त्यांची हत्या झाली त्याची चौकशी पुन्हा केली जाईल आणि ‘मातोश्री’च्या चौघांची ईडीमध्ये नोटीस तयार असल्याची माहिती राणे यांनी ट्वीट करीत दिली. हे घडल्यावर आपण आणि आपले बॉस कुठे धावणार, असा सवाल त्यांनी खासदार विनायक राऊत यांना उद्देशून केला आहे. राणे पिता-पुत्रांच्या अटकेपासून शिवसेना विरुद्ध राणे यांच्यातील संघर्ष आणखीनच वाढला आहे. उभयता परस्परांवर यथेच्छ टीका वा आरोप करीत आहेत