मुंबई : परिवहन विभागाने सुधारित दरपत्रक जाहीर केले असले, तरी ॲप आधारित कंपन्यांनी नवीन दर पत्रक लागू केलेले नाही. तसेच, बाइक टॅक्सीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि ॲप आधारित कॅब चालकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतरही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे टेस्लावाल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी ॲप आधारित वाहन चालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहेत. तसेच, मागण्या मान्य न झाल्यास ३० सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲप आधारित वाहन चालकांनी दिला आहे.
ओला, उबर आणि रॅपिडोविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचे नियोजन ॲप-आधारित ऑटो-रिक्षा आणि कॅब चालकांनी केले आहे. या कंपन्या सरकारी नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय मागण्यात येणार आहे. ‘मोदीजी ऐका’, ‘मोदीजी सुनिए’ या मोहिमेसाठी चालक एकत्र आले आहेत. ‘मोदीजी सुनिए’ असा संदेश असलेले स्टिकर्स, फलक आता शहरातील रिक्षा आणि टॅक्सींवर दिसणार आहेत.
चालक आणि त्यांच्या संघटनांचा आरोप आहे की, ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या कंपन्या राज्य वाहतूक नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे चालकांचे आर्थिक नुकसान होते. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कायद्याचे उल्लंघन करत असूनही सरकारी अधिकारी त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाही. तसेच मंत्री स्वतः अशा कंपन्यांकडून प्रायोजकत्व स्वीकारतात, ज्यांच्याविरुद्ध या अधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवले आहेत, असे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डाॅ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीच्या अनुषंगाने ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहेत, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
महायुती विरोधात मतदान शपथ राज्याच्या सहाय्यक परिवहन आयुक्तांना वारंवार लेखी व तोंडी सरकारी दर पाळण्याचे आश्वासन देऊनही ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांनी आजतागायत त्यांच्या मोबाइल ॲपवर कोणतेही सुधारित दर लागू केलेले नाहीत. आम्हाला ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी आमच्या हक्कांचे दर नाही मिळाले व बाईक टॅक्सी बंद केली नाही. तर, ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व कॅब, रिक्षा व टॅक्सी चालक महायुती विरोधात मतदान करण्याची शपथ घेतील, असे क्षीरसागर यांनी सांगितले.