मुंबई : कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील राम किसन मेस्त्री चाळीत २४ सप्टेंबर रोजी वायू गळतीमुळे लागलेल्या आगीत सातजण जखमी झाले होते. त्यापैकी तीन जखमींचा रविवारी, तर एका जखमीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता चार झाली आहे. रेखा जोशी (४७), नीतू गुप्ता (३१), पुनम (२८), शिवानी गांधी (५१) अशी मृतांची नावे आहेत.

राम किसन मेस्त्री चाळीत २४ सप्टेंबर रोजी दुर्घटना घडली. चाळीत खानावळीचा व्यवसाय सुरू असलेल्या घरात स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गळती होत होती. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी सिलिंडर पाण्याच्या पिंपात उलटा केला होता. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वायू गळती होऊन अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्घटनेत शिवानी गांधी (५१), नीतू गुप्ता (३१), जानकी गुप्ता (३९), मनराम (५५), रेखा जोशी (४७), दुर्गा गुप्ता (३०), पुनम (२८) हे सातजण जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रेखा जोशी, नीतू गुप्ता, पुनम व शिवानी गांधी या चार महिलांचा मृत्यू झाला.

नीतू गुप्ता आणि पुनम यांच्यावर ऐरोली बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. तर रेखा जोशी या कस्तुरबा रुग्णालयात दाखल होत्या. रविवारी रात्री ९ च्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, शिवानी गांधी यांचा सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ऐरोली बर्न रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.