करोना महासाथीचा राज्याच्या तिजोरीवर विपरीत परिणाम झाला असून, चालू आर्थिक वर्षांत अपेक्षित उत्पन्नात एक लाख कोटींची तूट आली. आर्थिक आघाडीवर मोठे आव्हान असल्याने जास्त काही अपेक्षा बाळगू नका, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन ठरावावरील चर्चेच्या उत्तरात अजितदादांनी आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही, असेच संके त दिले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे बँकांमध्ये जमा झालेले नसल्याचा मुद्दा जयंत पाटील (शेकाप) यांनी उपस्थित केला होता. चालू आर्थिक वर्षांत आलेल्या तुटीमुळे पुढील आर्थिक वर्षांतही त्याचे परिणाम जाणवतील. येत्या सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्य सरकार कोणते उपाय योजणार याची सविस्तर माहिती दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
निधिवाटपात अन्याय नाही..
राज्याच्या सर्वागीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असून, निधिवाटपात कोणत्याही भागावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही पवार यांनी दिली. मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानेच स्थावर मालमत्ता क्षेत्रात गती आली. त्यातूनच घरखरेदीचे व्यवहार वाढल्याचेही त्यांनी सांगितले.
अपेक्षा आणि निराशा..
चालू आर्थिक वर्षांत राज्य सरकारने ३ लाख ४७ हजार कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित धरले होते; परंतु करोना, टाळेबंदीने सारेच नियोजन कोलमडले. जानेवारीअखेर १ लाख ८८ हजार कोटींचे उत्पन्न जमा झाले होते.
पुन्हा रुग्णवाढीमुळे.. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत चांगले महसुली उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असताना करोनाचे रुग्ण वाढल्याने राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा र्निबध लागू करावे लागले. एकू ण एक लाख कोटींची तूट आल्याने परिस्थिती बिकट झाली आहे.
करोनामुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. जवळपास एक लाख कोटींचे उत्पन्न कमी झाले. यामुळे खर्चावर नियंत्रण आले. राज्यासमोर मोठे आव्हान असून, जास्त अपेक्षा बाळगू नका.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री
