राज्य सरकारची कबुली ; यंदा उत्पादनात ५० टक्क्यांची घट?
मुंबई : लांबलेला पाऊस आणि उशिरा झालेली लागवड यामुळे यंदाच्या खरीप हंगामात कांद्याच्या उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक घटल्यामुळेच दरवाढ होत असल्याची कबुली राज्य सरकारने मंगळवारी दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पसरला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात कांद्याचे उत्पादनच कमी असल्याने दरवाढ होईल असे संकेत देत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
सर्वसाधारण खरीप व लेट खरीप हंगामातील कांदा जास्त दिवस टिकवून ठेवता येत नसल्याने शेतकरी असा कांदा तातडीने बाजारात आणतो. त्यामुळे आवक वाढते आणि कांद्याच्या दरात घट होते. राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी कांद्याचे उत्पादन क्षेत्र ०.४२ लाख हेक्टर असून उत्पादन ५.४६ लाख मेट्रीक टन इतके अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कांद्याची लागवड ०.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर होती. त्या तुलनेत कांदा लागवडीत यंदा ५० टक्कय़ांपेक्षा जास्त घट असून लांबलेल्या पावसामुळे खरीप कांद्याच्या क्षेत्रात घट झाल्याने दरवाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे.
राज्यात एकूण उत्पादनाच्या ७० ते ८० टक्के कांदा विक्री झाला असून सध्या राज्यातील शेतकरी व व्यापाऱ्य़ांकडे सुमारे १० ते १५ लाख मेट्रीक टन कांदा उपलब्ध असल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ नंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण दिसून येताच सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्य़ांना प्रति क्विंटल २०० रुपयांप्रमाणे ५०० कोटींचे अनुदान दिले होते. या निर्णयाचा नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे ग्रामीण, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, जालना, अमरावती, अकोला, बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्’ांना लाभ झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.