मुंबई : एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या अभ्यासक्रमांसाठी बुधवारी सायंकाळपर्यंत ६० हजाराांहून अधिक अर्ज आले असून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार कागदपत्रे अपलोड आणि शुल्क भरण्यासाठी मुदत आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून यानंतर पहिली गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याना वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्याचवेळी राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यासदर्भातही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्य कोट्याअंतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया सुरू केली. बुधवारी सायंकाळपर्यंत तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. ही मुदत रात्री ११ः५९ पर्यंत असणार आहे. या विद्यार्थ्यांना कागदपत्रे आणि शुल्क भरण्यासाठी गुरुवार शेवटचा दिवस असणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यातील विविध अभ्यासक्रमांसाठी एकूण ४८ हजार ०३९ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा आयुर्वेद पदवी (बीएएमएस) अभ्यासक्रमासाठी असून एकूण ९ हजार ७३१ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी (बीएचएमएस) ४ हजार ४१७, फिजिओथेरपीसाठी (बीपीटीएच) ५ हजार १९५ आणि सर्वाधिक मागणी असलेल्या एमबीबीएससाठी एकूण ८ हजार १४१ जागा आहेत. यात ३६ शासकीय महाविद्यालयांत ४ हजार १५७ जागा असून, ५ अनुदानित संस्थांमध्ये ७६४ आणि २३ खासगी संस्थांमध्ये ३ हजार २२० जागा आहेत. तसेच दंतशास्त्र अभ्यासक्रमासाठी (बीडीएस) एकूण २ हजार ६७५ जागा असून यातील बहुतांश जागा खासगी महाविद्यालयांत आहेत.
केवळ अंतिम नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून, त्यातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची अंतरिम यादी आणि जागांचा तपशील २ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीसाठी ३ ते ५ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी ७ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. या यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ८ ते १२ ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.