घाटकोपर पूर्व येथील भलामोठा जाहिरात फलक पडल्यानंतर शहरातील अनेक अनधिकृत फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत आणि धोकादायक ठरलेले सर्व फलक हटवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत. दरम्यान, घाटकोपरमधील सर्वांत उंच फलक लावण्यासाठी वृक्षतोड झाल्याचीही माहिती समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पालिकेकडून या फलकाविरोधात तीन नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. पहिली नोटीस मार्च २०२३ मध्ये परवाना शुल्काबाबत, दुसरी या वर्षी २ मे रोजी झाडांच्या नुकसानीबद्दल आणि तिसरी नोटीस अनधिकृत जाहिरात फलक जोरदार वाऱ्यांमुळे पडण्याच्या काही वेळापूर्वीच आली होती. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने १२०*१२० फूट मेटल बिलबोर्ड लावला होता. या प्लॉटच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (GRP) यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जाहिरात फलक उभारण्यात आलेली जमीन सध्या महाराष्ट्र सरकारच्या पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या ताब्यात आहे.

हेही वाचा >> नरेंद्र मोदींच्या रोड शोमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती, संतप्त चाकरमन्यांकडून VIDEO पोस्ट

“आमच्याकडून (BMC) कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत जाहिरात फलक उभारण्यात आले होते आणि हे मुंबई महानगरपालिका (MMC) कायद्याच्या कलम ३८८ चे उल्लंघन आहे,” असे पालिकेने सोमवारी जारी केलेल्या ताज्या नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस होर्डिंग कोसळण्याच्या काही तास आधीच बजावण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सहा कोटींची थकबाकी

“हे होर्डिंग एप्रिल २०२२ मध्ये उभारण्यात आले होते आणि तेव्हापासून एजन्सीकडे ६.१४ कोटी रुपयांचे परवाना शुल्क देखील प्रलंबित आहे. त्यामुळे, तुम्हाला याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या आत थकित परवाना शुल्काचा भरणा करा आणि त्या जागेतील तुमची सर्व होर्डिंग्ज देखील दहा दिवसांच्या आत काढून टाका”, असं इगो मीडियाला जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >> VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!

विष देऊन वृक्षतोड

पालिकेने २ मे रोजी जीआरपीला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आम्हाला (बीएमसी) तक्रार प्राप्त झाली आहे की घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस कर्मचारी वसाहतीमधील जाहिरातदाराने होर्डिंगसाठी अडथळा दूर करण्यासाठी विष देऊन झाडे तोडली आहेत. यानंतर आमच्या गार्डन सेलच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती आणि पंत नगर पोलिस स्टेशनमध्ये इगो मीडियाविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता. म्हणून, महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार, इगो मीडियाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि होर्डिंग देखील ताबडतोब काढून टाकण्यात यावे”, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

होर्डिंगच्या जागेवर असलेली वृक्षतोड केल्याचा संशय पालिकेला आल्याने त्यांनी नोटीस बजावली होती. झाडांना मारण्याकरता त्यांच्या खोडामध्ये छिद्र पाडून त्यात विष टाकले असल्याचा आरोप या नोटिशीतून करण्यात आला आहे. या विषयप्रयोगामुळे ४० झाडांची पाने गळून पडली, अखेरिस ही झाडेही मेली, असं या नोटिशीत म्हटलं आहे, अशी माहिती पालिकेच्या झोनल वनविभागातील अधिकाऱ्याने दिली.

मदतकार्य थांबवले

गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर येथे एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून फलकाखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता. ही शोध मोहीम गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. मात्र हे मदतकार्य गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले असून सध्या केवळ ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poison was given to the trees that were obstructing the erection of hoardings sgk