मुंबई : धारावीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी सराईत आरोपी मोहम्मद शेख ऊर्फ अज्जू (३७) याला अटक केली. त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडील बेकायदा शस्त्रातून सुटलेल्या गोळीमुळे महिला जखमी झाली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

धारावीतील ९० फूट रोडवर रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात सरवर बेगम शेख (३२) जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्या तेथे खरेदी करीत होत्या. त्यावेळी हाताला गोळी लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. परिसरातील अनेक सीसी टीव्ही तपासून गोळीबार करणाऱ्याच्या हालचालींचा मागोवा घेऊन मोहम्मदला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बंदूक हाताळताना ही गोळी सुटल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सरवर बेगम शेख रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी उभ्या असताना त्यांच्या हातावर गोळी लागली. तक्रारदार महिला मूळची बिहार येथील रहिवासी असून तिचा पती फळ विक्रेता आहे. ती धारावी परिसरात पती व मुलांसह राहते. या गोळीबारात तिच्या हाताला गंभीर जखम झाली. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने शेखला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेला मारण्याचा कोणताही हेतू नव्हता. बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याचे त्याने सांगितले.