मुंबई : पूर्व उपनगरातील भांडूप स्थानक परिसरातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून खड्डे आणि फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील रस्तावरून खड्डे चुकवत चालायचे, तर फेरीवाले आड येतात अशी अवस्था पादचाऱ्यांची झाली आहे. संपूर्ण मुंबईतून मुंबई महापालिकेकडे जितक्या खड्ड्यांच्या तक्रारी आल्या, त्यातील दोन हजार तक्रारी या केवळ भांडूपमधील असल्याचे आकडेवारीवरून आढळून आले आहे. त्यामुळे भांडूपमध्ये पादचाऱ्यांना चालायला जागाच नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
मुंबई महापालिकेने खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न दाखवलेले असले तरी भांडूपवासियांसाठी हे स्वप्न अद्याप दूर आहे. भांडुप पश्चिमेला असलेल्या स्थानक परिसरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने गर्दीच्या वेळी दाटीवाटीने चालताना पादचाऱ्यांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अचानक पाय खड्ड्यात पडून कपाळमोक्ष होण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत. तर पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले हक्काचे पदपथ फेरीवाल्यांनी अडवून ठेवले आहेत. त्यामुळे भांडूप स्थानकातून बाहेर पडणाऱ्यांना किंवा भांडूप स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या पादचाऱ्यांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागते आहे. भांडूपकरांचा हा त्रास समाज माध्यमांवरून व्यक्त होऊ लागला आहे.
भांडुप स्थानकाच्या बाहेर पडताच अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. गर्दीच्या वेळी चालताना हे खड्डे दिसत नाहीत आणि अशा वेळी खड्ड्यामुळे अनेकदा पादचाऱ्यांचे पाय मुरगळतात. मात्र पालिकेला याचे काही सोयरसुतक दिसत नाही, अशा तक्रारी समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागल्या आहेत. बस किंवा लोकल पकडण्यासाठी जाणाऱ्या पादचाऱ्यांना येथील खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. हे खड्डे चुकविण्यासाठी पदपथावरून जायचे ठरवले तरी फेरीवाले, दुकानदार यांनी सर्व ठिकाणी ठाण मांडले आहे.
मुंबई महापाालिका या फेरीवाल्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही, अशाही तक्रारी येथील नागरिक करीत आहेत. फेरीवाल्यांवर कधी कारवाई केलीच तरी पालिकेची गाडी निघून जाताच पुन्हा फेरीवाले येतात. त्यामुळे ही कारवाई म्हणजे केवळ दिखावाच असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. केवळ दंडात्मक कारवाई करून फेरीवाल्यांना पुन्हा मोकळे सोडून दिले जाते. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून फेरीवाले, तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांना ज्या त्रासाला सामोरे जावे लागते त्याविषयी काहीही देणेघेणे नाही, अशीही चर्चा आहे.
सर्वाधिक खड्डे भांडूपमध्ये ?
मुंबई महानगरपालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी उपलब्ध केलेल्या यंत्रणेत भांडूप परिसरातून सर्वाधिक तक्रारींची नोंद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबई महापालिकेकडे सुमारे दहा हजार तक्रारी आल्या आहेत. त्यापेकी तब्बल २२०० तक्रारी केवळ भांडूपमधील आहेत. पालिका प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले असून परिमंडळ ६ च्या उपायुक्तांनी भांडूप परिसरात खड्डे भरण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक खड्डे भरणी केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे या परिसरात सर्वाधिक खड्डे भरल्याचे डॅशबोर्डवर दिसत असल्याचे मत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.