मुंबई : लघुपटाच्या निवड चाचणीसाठी बोलावून १७ अल्पवयीन मुलांना पवईमधील स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवले. पोलिसांनी स्वच्छतागृहातूून प्रवेश करून १७ मुलांसह एकूण १९ जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. सुमारे अडीच तास हे अपहरणनाट्य रंगले.

पवईमधील साकीविहार रोड येथे महावीर क्लासिक ही दहा मजली इमारत आहे. येथील पहिल्या मजल्यावरील बटरफ्लाय नर्सिंग स्कूलच्या आवारात ‘आर ए’ नावाचा स्टुडिओ आहे. आरोपी रोहित आर्या (५०) याने काही दिवसांपासून येथील एक सभागृह भाड्याने घेतले होते. त्या सभागृहात गेल्या सहा दिवसांपासून एका शासकीय लघुपटासाठी निवड चाचणी (ऑडिशन) घेतली जात होती. आर्याने त्यासाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार मागील ३ दिवसांपासून राज्याच्या विविध शहरांतून अनेक मुले चाचणीसाठी येत होती. ही मुले १५ वर्षे वयोगटातील होती. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास १७ मुले तेथे चाचणीसाठी आली होती. त्यात ९ मुली आणि ८ मुलांचा समावेश होता. रोहितसह एक महिला आणि पुरुष असे दोन कर्मचारी स्टुडिओमध्ये होते. मुलांच्या पालकांना स्टुडिओमध्ये प्रवेश देण्यात आला नसल्याने ते इमारतीच्या खाली उभे होते.

दुपारी १ च्या सुमारास मुलांना जेवण करण्यासाठी सोडण्यात येणार होते. मात्र अचानक रोहितने १७ मुले आणि त्याच्या दोन कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवले. जेवणाची वेळ झाली तरी मुलांना बाहेर सोडण्यात न आल्याने काही पालकांनी मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहितने मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती पालकांना मिळाली.

ओलीस ठेवल्याची चित्रफीत

दरम्यान, रोहित आर्याने एक चित्रफीत तयार करून काही मुलांच्या पालकांना पाठवली. मी दहशतवादी नाही. माझी पैशांची मागणी नाही. मला फक्त संवाद साधायचा आहे. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. त्यासाठी मी ही योजना आखली असून मुलांना ओलीस ठेवले आहे, असे त्याने या चित्रफितीत सांगितले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. लहान मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळताच दुपारी दीड वाजता पवई पोलिसांसह दहशतवादविरोधी पथक, शीघ्रकृती दल आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

सुटका अशी केली?

अपहरणकर्त्याशी बोलून मुलांची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. स्टुडिओची संपूर्ण इमारत बंदिस्त असल्याने पोलिसांना आत प्रवेश करण्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. रोहित आर्या याच्याकडे एअरगन होती. त्याने संपूर्ण सभागृहाला सेन्सर लावले होते. त्याच्याकडे ज्वलनशील पदार्थ होता. त्यामुळे पोलिसांनी धोका न पत्करता स्वच्छतागृहाची खिडकी तोडून या सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी साडेतीन वाजता १७ अल्पवयीन मुले आणि दोन कर्मचारी अशा एकूण १९ जणांची सुखरूप सुटका केली. सध्या मुले सुखरूप असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, अशी अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू

मुलांची सुटका करताना पोलिसांनी एक गोळी रोहित आर्याच्या दिशेने झाडली होती. ती त्याच्या छातीत डाव्या बाजूला लागली. तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पवई पोलीस ठाण्यात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी गोळी झाडली होती. सुमारे अडीच तास हे ओलीसनाट्य रंगले होते.

काय घडले?

सकाळी १० : मुलांचा स्टुडिओच्या आत प्रवेश.

दुपारी १.३० : मुलांना डांबून ठेवण्यात आल्याची पालकांना माहिती

दुपारी २ : पवई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल.

दुपारी २.३० : शीघ्र कृती दल, दहशतवादविरोधी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

दुपारी ४ : पोलिसांकडून सर्व अल्पवयीन मुलांची सुटका.

दुपारी ४.३० : जखमी आरोपी पवईच्या एचबीटी रुग्णालयात दाखल.

संध्या. ५.१५ : आरोपीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.