मुंबई : जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समता परिषदेच्या वतीने भेट घेण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जाहीर केले. जातनिहाय जनगणना झाल्यास आरक्षणाचा प्रश्न आपोआप सुटेल आणि ओबीसी प्रवर्गात अन्य समाजांचा समावेश होणार नाही, असे ते म्हणाले. सरकारने ओबीसींवर अन्यायकारक भूमिका घेतल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, याची राज्य सरकारने लेखी हमी द्यावी, या मागणीसाठी पुणे, जालना येथे उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या संकुलात राज्यातील ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर भुजबळ म्हणाले, की अनुसूचित जाती व जमातीला ज्याप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळतो, तसा ओबीसींना मिळत नाही. त्यामुळे जातवार जनगणना झाली पाहिजे. खोट्या पुराव्यावर ५७ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रे दिली गेल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.

हेही वाचा >>>जातनिहाय जनगणनेसाठी लवकरच पंतप्रधानांची भेट; ओबीसींच्या प्रश्नावर छगन भुजबळ आक्रमक

पुण्यात उपोषण करणारे मंगेश सासणे आणि जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे उपोषण करत असलेले लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या ओबीसी कार्यकर्त्यांशी भुजबळ यांनी भ्रमणध्वनीवर संवाद साधला. ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश नको, यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार भुजबळ यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या आरक्षणाला धक्का बसण्याच्या शक्यतेने राज्यातील ओबीसी समाजात अस्वस्थता आहे.- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री