मुंबई : तानसा धरण परिसरातील महापालिकेच्या शाळेतील अपुऱ्या जागेमुळे अनेक विस्थापितांच्या मुलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते आहे. शाळेत केवळ सहा वर्गखोल्या असून त्यात बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. तसेच, शाळेच्या सभागृहातही बालवाडी व इयत्ता सातवीचे वर्ग सुरु आहेत. खोल्यांची पडदा लावून विभागणी करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, जागेअभावी त्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत.

तानसा धरणाच्या परिसरातील विस्थापीत आदिवासी बहुल मुलांच्या शिक्षणासाठी सन १९७४ साली जिल्हापरिषदेच्या शाळेचे महापालिका शाळेत रूपांतर करण्यात आले. तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीनुसार, तिथे तात्पुरत्या निवासी शेडमध्ये शाळा सुरु झाली. तानसा धरण येथील महापालिकेचे कामगार-कर्मचारी व अभियंते आदींची मुलेही या शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. एकेकाळी ५० ते ६० विद्यार्थी असलेल्या या शाळेत सद्यस्थितीत एकूण २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

तानसा धरणाच्या परिसरातील पालिकेच्या बैठ्या शाळेत आसपासच्या सुमारे २०० आदिवासी पाड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थ्यांना सुमारे १० किमीचे अंतर कापत शाळेत हजेरी लावावी लागते. यंदा शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून गेल्या तीन वर्षांपासून त्यात सातत्य आहे. मात्र, शाळेत पुरेसे वर्ग नसल्याने दोन इयत्तेच्या विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसविण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातच अडचणी निर्माण होत आहेत.

संबंधित शाळेत केवळ ६ वर्गखोल्या आणि १ सभागृह आहे. त्यातील दोन वर्गखोल्यांमध्ये संगणक कक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळा आहे. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण दिले जाते. तसेच, इयत्ता ९ वी आणि १० वीचे विद्यार्थीही एकाच वर्गात बसतात. इयत्ता सहावी आणि आठवीसाठी स्वतंत्र वर्ग आहेत. तसेच, शाळेच्या सभागृहात देखील पडदा लावून दोन वर्ग तयार करण्यात आले आहेत. त्यात बालवाडी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शिवाय, संगणक कक्ष आणि विज्ञान प्रयोगशाळेतही मुलांचे वर्ग घेतले जातात. सुमारे सात वर्षांपूर्वी शाळेची दुरुस्ती करण्यात आली असली तरी आता पुन्हा शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेमुळे आसपासच्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना बसायला पुरेसे वर्ग नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. संबंधित शाळेत विस्थापित कुटुंबातील विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या कामगार – कर्मचाऱ्यांचीही मुले शिक्षण घेत आहेत. तसेच, धरणासाठी त्या कुटुंबांना विस्थापित व्हावे लागल्याने किमान त्यांच्या मुलांना चांगल्या सोयी – सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. याबाबत अनेकवेळा महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे, असे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे रमेश भुतेकर यांनी सांगितले.

येत्या दोन ते तीन आठवड्यात महापालिकेचे शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी, शाळा पायाभूत सुविधा कक्ष, आणि जल अभियंता विभागामार्फत शाळेची पाहणी केली जाईल. तसेच, शाळेची बांधणी करताना मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी संक्रमण शिबीर किंवा अन्य पर्यायांचा अवलंब करण्यात येईल. त्यासाठी जागेचा शोध घेऊन पुढील कार्यवाही करू, अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.