मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर ‘University of Mumbai’ ऐवजी ‘University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाची १५ दिवसांपूर्वीच दखल घेऊन विद्यार्थ्यांना सुधारित पदवी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच काही मोजक्याच पदवी प्रमाणपत्रावरील नाव चुकल्याचेही मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले. मात्र सर्वच पदवी प्रमाणपत्रावरील नाव चुकल्याचा दावा ठाकरे गटाच्या युवा सेनेने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत पदवी प्रमाणपत्रावरील बोधचिन्हावर असणाऱ्या नावामध्ये चूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी तात्काळ विद्यापीठाकडे तक्रार करून ही प्रमाणपत्रे विद्यापीठाला परत केली. दरम्यान, पदवी वितरण सोहळा आयोजित केलेल्या सर्व महाविद्यालयांना प्रमाणपत्र परत करण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या होत्या. सुधारित पदवी प्रमाणपत्रानुसार महाविद्यालयांनी पदवी वितरण समारंभ आयोजित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच परीक्षा विभागामार्फत पदवी प्रमाणपत्राचा संपूर्ण मसुदा तपासल्यानंतर प्रमाणपत्र छापण्यास परवानगी दिली होती. पहिल्या गठ्यात प्राप्त झालेली सर्व प्रमाणपत्रे योग्य होती. भविष्यात अशा चुका होऊ नयेत, यासाठी छपाई प्रक्रियेत अधिक काटेकोर गुणवत्ता तपासणीचा अवलंब केला जाईल, असेही मुंबई विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.‘विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुंबई विद्यापीठ सरार्सपणे दुर्लक्ष करीत आहे. पदवी प्रमाणपत्रावरील नावातील चुकीमुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना सदर पदवी प्रमाणपत्र बनावट ठरवले जाईल. या प्रकरणी विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित आस्थापनास काळ्या यादीत टाकावे’, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी केली.

सर्व पदवी प्रमाणपत्रावरील नाव चुकल्याचा युवा सेनेचा दावा

शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ अंतर्गत विविध विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यामुळे या सर्वच पदवी प्रमाणपत्रावरील बोधचिन्हावर ‘University of Mumbai’ ऐवजी ‘University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या युवा सेनेने केला आहे. तसेच ‘बोधचिन्हावरील नावाचा घोळ लक्षात असूनही मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना यासंदर्भात कळवले नाही. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी पदवी प्रमाणपत्राचे वाटप केले. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्राचे वाटप करू नये आणि विद्यार्थ्यांना दिलेले पदवी प्रमाणपत्र तातडीने परत घेऊन विद्यापीठास सुपूर्द करावे आणि छपाई होऊन आल्यानंतर नवीन पदवी प्रमाणपत्र द्यावी, असे संबंधित प्राचार्यांना कळविण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयांकडून प्रमाणपत्र परत येण्याची वाट न बघता चुकलेली जवळपास १ लाख ६४ हजार ४६५ प्रमाणपत्र पुन्हा नव्याने छपाई करुन महाविद्यालयांना पाठवावीत’, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Process of issuing revised degree certificate started clear from mumbai university mumbai print news ssb