मुंबई : राज्य सरकारकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीमुळे भविष्य निर्वाह निधी (पीएफ), उपदान (ग्रॅच्युइटी) रक्कमेचा एसटी महामंडळाकडून गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटीच्या ट्रस्टकडे भरणाच केलेला नाही. ही रक्कम सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत असून त्यामुळे एसटीच्या राज्यातील ८८ हजार कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामगार-कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी प्रवासी उत्पन्नातूनही समायोजन करत आहे. याचा मोठा फटका भविष्य निर्वाह निधी आणि उपदान रक्कमेचा भरणा करण्यावर झाला आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सरकारकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने ही रक्कम एसटीच्या स्वतंत्र ट्रस्टकडे भरली गेली  नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही रक्कम सुमारे ५०० कोटी असल्याचेगी सूत्रांनी सांगतिले.

मागणी ७९० कोटींची दिले २०० कोटी

गेल्या पाच महिन्यांत एसटीला राज्य शासनकडून अपेक्षित निधी न मिळाल्याने या वेळी ७९० कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच शासनाने केवळ २०० कोटी रुपये दिले. 

सरकारने वेतनासाठी अपेक्षित निधी न दिल्याने भविष्य निर्वाह निधी व उपदान निधीची रक्कम एसटीच्या स्वतंत्र ट्रस्टकडे भरणा केलेली नाही.  त्यावरील व्याजही बुडाले आहे.

श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि उपदान निधीची रक्कम काही कारणांमुळे जमा होण्यास थोडा विलंब होत असला तरीही कर्मचाऱ्यांचे हे पैसे देण्यास अडचण नाही. 

शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provident fund gratuity amount not paid by st corporation to st trust for the last four to five months zws