मुंबई : नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे. पालिकेने सध्या संपूर्ण मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेतली असून या मोहिमेदरम्यान स्वच्छता झाल्यानंतर मुंबईतील नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱ्यामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स अशा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तूंचा समावेश आहे. हा कचरा रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या नाल्यांमध्ये बऱ्याचदा कचरा भिरकावला जातो. त्यामुळे नाल्यांच्यावर कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या तरंगत असतात. दरवर्षी पावसाळ्यात हा कचरा काढण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. मात्र दररोज नाल्यात साचणारा कचरा पालिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. नाले कचऱ्याने तुडुंब भरतात. परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादूर्भाव होतो. तसेच पावसाच्या पाण्याचा निचराही वेगाने होऊ शकत नाही. नाल्यांमध्ये फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याला अटकाव करण्यासाठी पालिका प्रशासनाने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या व आतापर्यंत केलेले सर्व उपाय फसले आहेत.

हेही वाचा – गायी, म्हैशीमुळे ४०० हून अधिक वेळा रेल्वे सेवा विस्कळीत

नाल्यावर सिमेंट कॉंक्रिटची आच्छादने केल्यानंतर त्यावर गाड्या उभ्या केल्या जातात. तसेच आच्छादनाच्या आत डासांची पैदास होत असे. तसेच आच्छादने तोडण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडले आहेत. आच्छादनांमुळे नालेसफाई करता येत नव्हती. त्यानंतर पालिकेने घुमटाकार आच्छादने लावण्याचा पर्यायही आणला. पण मोठ्या रुंदीच्या नाल्यांना आच्छादने लावता येत नव्हती. जनजागृती केल्यानंतरही झोपडपट्ट्यांमधून कचरा फेकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. जाळ्या लावल्या तरी त्या कापून आत कचरा टाकण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सगळे उपाय आतापर्यंत फसले आहेत.

आता पुन्हा एकदा पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने मुंबईत स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ, गटार आणि नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. या मोहिमेत अवघ्या १५ दिवसांत एकूण १०४२ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), १३९ मेट्रिक टन घनकचऱ्याचे अतिरिक्त संकलन करण्यात आले आहे. त्यासाठी ३७०० कामगार – कर्मचाऱ्यांनी अविरत श्रमदान केले आहे. मनुष्यबळाबरोबरच जेसीबी (३३), डंपर (१४८), कॉम्पॅक्टर (२१), फायरेक्स मशीन (७१), वॉटर टँकर (६९), सक्शन मशीन (६), लिटर पीकर मशीन (३), रोड स्वीपिंग मशीन (९) आणि मिस्टिंग मशीन (७) याप्रमाणे एकूण ३६७ संयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा – नऊ कोटींच्या कोकेनसह मुंबई विमानतळावरून परदेशी महिलेला अटक, डीआरआयची कारवाई

नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढण्याचे काम नियमितपणे सुरू आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन छोट्या नाल्यांच्या ठिकाणी जाळ्या लावता येतील का अथवा ते नाले बंदिस्त करता येतील का? तसेच मोठ्या नाल्यांच्या ठिकाणी स्क्रिनिंग किंवा नेटचा पर्याय वापरता येईल का? याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी जाळी बसविण्यात आली आहे. नाल्याच्या नजिकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता पालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punitive action will be taken against citizens who throw garbage in drains warning of mumbai mnc administration mumbai print news ssb