मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली – गायमुख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ आणि ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकांसाठी एकूण ५७ मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’साठी ३९ मेट्रो गाड्यांच्या खरेदीचे ४७८८ कोटी रुपयांचे कंत्राट एल. ॲण्ड टी. कंपनीला देण्यात आले आहे. ‘मेट्रो ६’ मार्गिकेसाठी १८ मेट्रो गाड्या खरेदी करण्याचे कंत्राट एनसीसी कंपनीला देण्यात आले आहे. एल. ॲण्ड टी. आणि एनसीसी कंपन्या प्रथमच मेट्रो गाड्या, मेट्रो गाड्यांच्या डब्यांची निर्मिती करणार आहे.
एमएमआरडीएने हाती घेतलेले ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ आणि ‘मेट्रो ६’चे काम सध्या वेगात सुरू आहे. ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांवरील कॅडबरी जंक्शन – गायमुख दरम्यानच्या १०.५ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याची चाचणी ऑगस्टमध्ये घेऊन हा टप्पा वर्षाअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ‘मेट्रो ६’ मार्गिकाही शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी मेट्रो गाड्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ आणि ‘मेट्रो ६’ मार्गिकांसाठी ५७ मेट्रो गाड्यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा करण्यात आला. ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ आणि ‘मेट्रो ६’ मार्गिकांसाठी गाड्या खरेदी करण्याच्या कंत्राटासंबंधीचा प्रस्ताव यावेळी मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. त्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली. त्यानुसार ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’साठीचे कंत्राट एल. ॲण्ड टी. कंपनीला, तर ‘मेट्रो ६’ मार्गिकेच्या गाड्यांच्या निर्मितीचे कंत्राट एनसीसी कंपनीला देण्यात आले आहे.
‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’साठी ३९ मेट्रो गाड्या खरेदी करण्याचे कंत्राट बाॅम्बार्डियर कंपनीला २०२१ मध्ये देण्यात आले होते. कंत्राट देण्यात आल्यानंतरही या मार्गिकेच्या कारशेडचा वाद सुरू होता. कारशेड होणार की नाही याबाबत पेच होता. त्यामुळे या कंपनीने मार्गिकेस विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन करार रद्द केला. काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने पुन्हा ३९ गाड्यांच्या खरेदीसाठी निविदा मागविल्या. कार्यकारी समितीच्या बैठकीत एल. ॲण्ड टी.ची ४७८८ कोटी रुपयांची निविदा अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आली होती. त्याला मान्यता देण्यात आली असून ३९ गाड्यांची खरेदी आता एल. ॲण्ड टी. करणार आहे. ‘मेट्रो ६’ मार्गिकेसाठी गाड्यांच्या खरेदीबाबतची निविदा जानेवारी २०२४ मध्ये काढण्यात आली होती. या निविदेला अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतर अखेर आता निविदा अंतिम करून १८ गाड्यांच्या निर्मितीचे २२६९ कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसी कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटानुसार या दोन्ही कंपन्यांवर मेट्रो गाड्याच्या पाच वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असणार आहे.