मुंबई: मंगळवारी दोन मोनोरेल गाड्या अतिगर्दीमुळे वीज पुरवठा बंद होऊन बंद पडल्या. बंद पडलेल्या म्हैसूर काॅलनी स्थानकाजवळील गाडी दुसऱ्या मोनोरेले गाडीने खेचून स्थानकापर्यंत नेत प्रवाशांची सुटका करणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादितला (एमएमएमओसीएल) शक्य झाले नाही. त्यामुळे मुंबई महागनर पालिकेच्या अग्निशमन दलाची मदत घेत गाडीचा दरवाजा तोडून प्रवाशांची सुटका करण्याची वेळ मंगळवारी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलवर आली. मात्र या घटनेमुळे मोनोरेल प्रकल्पाच्या, मोनोरेलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास दुसरी मोनोरेल गाडी आणून बंद गाडी खेचून नेण्याशिवाय इतर कोणताही पर्याय मोनोरेलचे संचलन करणाऱ्या एमएमएमओसीएलकडे नाही. आगीसारखी घटना घडल्यास किंवा गाडी खेचून नेणे शक्य नसल्यास प्रवाशांची सुटका करण्यासाठी एमएमएमओसीएकडे सक्षम वा स्वतंत्र यंत्रणा नाही. अशावेळी अग्निशमन दलाच्या मदतीची गरज एमएमएमओसीएलला भासत असल्याची माहिती समोर आली आहे.
चेंबूर ते जेकब सर्कल अशी २० किमीची मोनोरेल मार्गिका सध्या वाहतूक सेवेत दाखल असून ही देशातील एकमेव मोनोरेल मार्गिका आहे. या मार्गिकेतील पहिला टप्पा २०१४ मध्ये तर दुसरा टप्पा २०१९ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. मोनोरेल सेवेत दाखल झाल्यापासून ती विस्कळीत होण्यासह मोनोरेल गाडीत तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारताना प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्कालीन परिस्थितीशी सामाना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रकल्पात केल्या जातात. त्यानुसार मोनोरेल प्रकल्पातही आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांचा हा दावा मंगळवारी खोटा ठरला आहे.
म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक मंगळवारी गाडी बंद पडली. दुसऱ्या गाडीने ती गाडी खेचूनही नेता येईना, त्यामुळे शेवटी अग्निशमन दलाची मदत घेत शिडी लावून गाडीचा दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढावे लागले. या घटनेमुळे आगीसारख्या दुर्घटना घडल्यास काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोनोरेल स्थानकात, गाडीत अग्निशामक यंत्रणा आहेत, असे एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली. मात्र आग लागली तर दारे, खिडक्या उघडून, तोडून प्रवाशांना बाहेर पडणे शक्य नाही. तर प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी एमएमएमओसीएलकडे स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोनोरेलसाठी उन्नत मार्गिका असून ती एका छोट्या खांबावरुन धावते. त्यामुळे गाडी बंद पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मेट्रोप्रमाणे दुसऱ्या मार्गिकेवरून दुसरी गाडी आणून प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेता येत नाही. त्यामुळे दुसरी मोनोरेल आणून गाडी खेचून न्यावी लागते. गाडी खेचता न आल्यास मात्र अग्निशमन दलाशिवाय पर्याय नाही.
एका मोनोरेलला २०१७ मध्ये पहाटे म्हैसूर काॅलनी स्थानकानजीकच आग लागली होती. तेव्हा गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. यावेळी अग्निशमन दलानेच आगी विझवली होती. या सर्व बाबी लक्षात घेता मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी किंवा अशा परिस्थितीत प्रवाशांची सुटका करण्यासाठी मोनोरेल प्रकल्पाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. अशावेळी अग्निशमन दलाचीच मदत घ्यावी लागते. २०१७मध्येही आम्हीच आग विझवली होती अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
म्हैसूर काॅलन स्थानकानजीक मंगळवारी सायंकाळी अतिगर्दीमुळे बंद पडलेल्या मोनोरेल गाडीचा दरवाजा तोडावा लागला. शिडी वापरून प्रवाशांची सुटका करावी लागली. त्यावेळी अग्निशमन दलाने ५८२ प्रवाशांची सुखरुप सुटका केली. म्हैसूर काॅलनी स्थानकानजीकच्या घटनेनंतर काही मिनिटाने वडाळा स्थानकानजीक दुसरी गाडी अतिगर्दीमुळे बंद पडली. मात्र ती दुसऱ्या गाडीने खेचून नेण्यात एमएमएमओसीएलला यश आले. या गाडीतून ५६६ प्रवाशांना एमएमएमओसीएलने बाहेर काढले. एकूण ११०० हून अधिक प्रवाशांचा जीव मंगळवारी टांगणीला लागला होता. मात्र त्यांची सुखरुप सुटका झाली आणि कोणतीही दुर्घटना घडली नाही.