पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकार फक्त मोठमोठ्या घोषणा करत आहे. पण या घोषणांना आर्थिक आधार काहीच नसल्यामुळे सरकारची विश्वासार्हता कमी होऊ लागली असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुंबईमध्ये केली.
राहुल गांधी दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहेत. मालाडमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, स्मार्ट सिटीची योजना जाहीर केली त्यावेळी मलाही ती आवडली होती. पण आता मुंबईसारख्या शहराला या योजनेतून वर्षांला १०० कोटी मिळणार आहेत. त्यातून हे शहर कसे स्मार्ट होणार, हा प्रश्नच आहे. आम्ही जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेतून नांदेडसारख्या शहराला २००० कोटी दिले होते. मोदी सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते. पण त्या घोषणांमागे आर्थिक आधार काहीच नसल्यामुळे जनमानसातील सरकारची विश्वासार्हता कमी होऊ लागली आहे. सरकार स्टार्ट-अपची भाषा करते. पण देशात अनेक गरीब लोक आहेत. शेतकरी, मजदूर आहेत. त्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे काहीच उत्तर नाही. देशातील शेतकऱ्यांशी बोलले की निम्म्याहून अधिक शेतकरी रडायला लागतात. त्यांना पुढे काहीच भविष्य दिसत नाहीत. सरकारने मोजक्या लोकांच्या विकासासोबतच गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, मजदूरांच्या विकासाकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
काँग्रेस पक्षासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. तसे केले तर तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असे सांगत त्यांनी मुंबई काँग्रेसमधील गटबाजीलाही अप्रत्यक्षपणे फटकारले. मंत्र्यांनी आणि नेत्यांनी हातात झाडू घेऊन एकदिवस सफाई केली म्हणून कोणतेही शहर साफ होणार नाही, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानावरही टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi criticized narendra modi govt in rally at malad