मुंबई : साकीनाका पोलिसांनी कर्नाटकमधील म्हैसूर येथे अमली पदार्थ निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून ३८१ कोटी रुपये किंमतीचे १८७ किलो एमडी (मॅफेड्रिन) जप्त केले. वसईतील गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ३ महिन्यात ३९० कोटी रुपये किंमतीचे एमडी जप्त केले आहे. या प्रकरणात चार आरोपीेंना अटक करण्यात आली आहे.

साकीनाका पोलिसांनी एप्रिल महिन्यात वसई (पूर्व) परिसरातील कामण येथे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून चार किलो ५३ ग्रॅम वजनाचे आठ कोटी रुपये किंमतीचे एमडी जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात सलीम शेख उर्फ सलीम लंगडा (४५) हा मुख्य आरोपी फरारी होता. या प्रकरणाचा तपास साकीनाका पोलीस तपास करत होते. पोलिसांच्या विशेष पथकाने वांद्रे रेक्लेमेशन येथून सलीम लंगडा याला अटक केली.

म्हैसूरमध्ये एमडीचा कारखाना

कर्नाटकमधील म्हैसूर येथून एमडी आणत असल्याची माहिती सलीम लंगडाने चौकशीत दिली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. म्हैसूर शहरातील रिंग रोडवरील रस्त्याच्या कडेला निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये एमडीचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून १८७ किलो एमडी जप्त केले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार ३८१ कोटी रुपये किंमत आहे. याशिवाय एमडी बनविण्यासाठी लागणारे अल्कोहोल, क्लोरोफॉर्म, मॅग्निशिअम सल्फेट, ॲसीटोन आदी रसयाने आणि अन्य साहित्य जप्त केेले. या प्रकऱणी एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे.

एकूण ३९० कोटींचे अमली पदार्थ दप्त

वसईमधील कामण येथे एप्रिलमध्ये आठ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना म्हैसूर येथून ३८१ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले. एकाच गुन्ह्यात तीन महिन्यात तब्बल ३९० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-१० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

या पथकाने केली कारवाई

परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (मेघवाडी विभाग) संपत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) प्रदीप मैराळे, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे, पोलीस निरीक्षक युवराज क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल कारंडे आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.