मुंबई : भारतीय रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या विनावातानुकूलित प्रवासी दरात १ पैसा आणि वातानुकूलित लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या वातानुकूलित प्रवासी दरात २ पैशांची वाढ केली आहे. मुंबई लोकलच्या प्रवासी तिकीट दरात कोणताही बदल झालेला नाही. वातानुकूलित आणि सामान्य लोकल दर जैसे-थे ठेवल्याने लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय रेल्वेने १ जुलै २०२५ पासून प्रवासी भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ मुख्यतः लांब पल्ल्याच्या प्रवासावर लागू होईल. तर, ५०० किमीपर्यंतच्या द्वितीय श्रेणी वर्गातील प्रवासासाठीही भाडेवाढ लागू होणार नाही. यांसह उपनगरीय वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या तिकीट आणि मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अशी केली भाडेवाढ
विनावातानुकूलित लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी – प्रति किमी १ पैशांची वाढ
वातानुकूलित श्रेणीतील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी – प्रति किमी २ पैशांची वाढ
द्वितीय श्रेणी प्रवास –
– रेल्वे प्रवासाच्या ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताही बदल नाही.
– रेल्वे प्रवासाच्या ५०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी प्रति किमी ०.५० पैशांची (अर्धा पैसा) वाढ
– उपनगरीय रेल्वे आणि मासिक पास यांच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही.