मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मूळ नाव राज ठाकरे नसून वेगळंच असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या नावामागील किस्साही सांगितला. मुंबईतील मुलुंड येथे महाविद्यालयी विद्यार्थीनीने आम्हाला सूत्रांकडून तुमचं खरं नाव स्वरराज असल्याची माहिती मिळाल्याचं म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी त्यांच्या नावाची गोष्ट सांगितली. इतकंच नाही तर आई आणि बहिणीच्या नावाबाबतही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे म्हणाले, “यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. माझे वडील संगितकार होते. माझ्या वडिलांकडे मोहम्मद रफींनी १४ गाणी मराठीत गायली. माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी संगितात काहीतरी करावं. त्यामुळे त्यांनी माझं पहिलं नाव स्वरराज असं ठेवलं.”

“माझ्या आईचं नाव लग्नात त्यांनी मधुवंती असं ठेवलं”

“माझ्या आईचं नाव लग्नात त्यांनी मधुवंती असं ठेवलं. मधुवंती हा संगितातील एक राग आहे. माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती ठेवलं, जयजयवंती हाही एक राग आहे. कालांतराने नंतर माझ्या वडिलांना माझा राग कळला. मला राग कुठे येतो, कुठे जातो हे त्यांना समजलं,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : “माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

“एकेदिवशी बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावलं आणि…”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मी जेव्हा व्यंगचित्र करायला लागलो तेव्हा स्वरराज नावाने व्यंगचित्रं काढायचो. एकेदिवशी बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावलं आणि म्हणाले की, त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली आहे. तसेच आजपासून मी राज ठाकरे नावाने करियरची सुरुवात करावी, असं ते म्हणाले. तेव्हापासून माझं नाव राज ठाकरे झालं.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray tell story behind his original name swarraj thackeray by father pbs