‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणातील अधिकाऱ्याचा मुलगा ठाणे जिल्हा भाजयुमोच्या अध्यक्षपदी
गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्यांना किंवा घोटाळेबाजांना पक्षात थारा नाही, असा दावा भाजपचे नेते वारंवार करीत असले तरी फसवणुकीच्या आरोपावरून तुरुंगवास भोगलेले निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्रनाथ आंग्रे तसेच महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या मुलाची भाजपने महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील जुन्याजाणत्या भाजप नेत्यांचा विरोध डावलून या नियुक्त्या झाल्या आहेत.
आंग्रे हे नेहमीच वादात राहिले होते. फसवणुकीच्या आरोपावरून वर्षभरापेक्षा जास्त काळ ते तुरुंगात होते. या आंग्रे यांची ठाणे विभागीय भाजपच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा मुलगा हृषीकेश याची ठाणे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सत्तांतरानंतर आंग्रे पिता-पुत्र भाजपमध्ये दाखल झाले होते. अवघ्या दीड वर्षांत त्यांची पक्षात महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झाली आहे.
याबरोबरच ठाणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अश्वजित गायकवाड याची नियुक्ती वादग्रस्त ठरली आहे. त्यांचे वडील अनिल गायकवाड हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन अधीक्षक अभियंता व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील संशयित आहेत. सध्या तुरुंगाची हवा खात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे गायकवाड हे निकटवर्तीय मानले जातात. अनिल गायकवाड यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या चौकशी सुरू असून, भुजबळ यांच्याप्रमाणेच त्यांची कधीही तुरुंगात रवानगी होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. अशा या गायकवाड यांच्या मुलाला भाजपने पावन करून घेतले.
ठाणे जिल्ह्य़ातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पावले टाकली. ठाण्यातील बिल्डरच्या आत्महत्येप्रकरणी चार नगरसेवकांना तुरुंगात टाकले. ही पाश्र्वभूमी असली तरी राज्य पातळीवरील भाजपच्या एका बडय़ा नेत्याच्या ‘आशीर्वादा’मुळेच आंग्रे किंवा गायकवाड यांच्यासारख्यांना पक्षात महत्त्व आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या ठाणे दौऱ्यात रवींद्र आंग्रे यांच्याकडून दानवे यांना शुभेच्छा देणारे फलक गल्लोगल्ली झळकतात याकडे भाजपचेच कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत.
राष्ट्रवादीतून आलेले भिंवडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडे ठाणे विभागीय अध्यक्षपद सोपविण्यात आली. यापाठोपाठ या वादग्रस्त नेमणुका झाल्याने पक्षात नाराजी आहे.