मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांचा परिसर फेरीवालामुक्त व्हावा, प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सुरक्षितपणे गर्दीमुक्त रस्त्याने मार्गस्थ होता यावे या उद्देशाने स्थानकालगतचा १५० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. मात्र, या धोरणाची रेल्वे आणि विविध महानगरपालिकांकडू होणारी अंमलबजावणी तात्पुरती मलमपट्टी ठरू लागली आहे. परिणामी, पुन्हा एकदा स्थानकाचा परिसर फेरीवाल्यांचा कलकलाट आणि गर्दीमुळे गुदमरू लागला आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मिरा-भाईंदर आणि वसई विरार पालिकेकडून कारवाई करण्यात येत असून गेल्या पाच महिन्यात पश्चिम रेल्वेने २००, तर मध्य रेल्वेने ८८२ फेरीवाल्यांची धरपकड केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. करोनाकाळात लागू केलेले र्निबध हटविण्या आल्यानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली. हेच हेरुन अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा रेल्वे स्थानकाच्या हद्दीत घुसखोरी करण्यास सुरुवात केली. काही रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारांजवळच फेरीवाल्यांनी आपले बस्तान बांधले आहे. तर स्थानकाच्या हद्दीतही फेरीवाल्यांचा मोठय़ा प्रमाणावर वावर वाढला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार महानगर प्रदेशातील महानगरपालिकांनी रेल्वे स्थानकांलगत १५० मीटर क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठी धोरण आखले होते. र्निबध शिथिल होताच स्थानकालगतच्या परिसरात पुन्हा फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, महानगरपालिका यांनी रेल्वे स्थानकालगतचा १५० मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली. मात्र, कारवाई करणारे पथक संबंधित ठिकाणाहून निघून गेल्यानंतर पुन्हा फेरीवाले मूळ ठिकाणी पथाऱ्या पसरत आहेत.

महानगरपालिकांच्या मदतीने रेल्वे स्थानकांलगतच्या १५० मीटर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त विनीत खर्ब सांगितले. २०२२ मध्ये ५८ ठिकाणी २०० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून लाखो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनेही गेल्या पाच महिन्यात मुंबई विभागात ८८२ फेरीवाल्यांवर दंडाचा बडगा उगारला आहे. यामध्ये स्थानक हद्दीबरोबरच लोकल आणि मेल, एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये वावरणाऱ्या फेरीवाल्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून एकूण ११ लाख १८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार उपनगरीय रेल्वे स्थानक हद्दीत अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने पाच महिन्यांत ८३ विशेष मोहीम हाती घेतल्या. या कारवाईत रेल्वेच्या हद्दीत ७५९ वाहने अनधिकृतपणे उभी केल्याचे आढळले.