संदीप आचार्य 
मुंबई : करोनावरील प्रभावी औषध म्हणून पाहिले जाणारे रेमडीसीवर व टोसीलीझुमॅब ही औषधे नेमक्या कोणत्या अवस्थेतील करोना रुग्णांना वापरली पाहिजे याची सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे आरोग्य विभागाने शनिवारी जाहीर केली आहेत. यामुळे खासगी रुग्णालयांना यापुढे कोणत्याही रुग्णांसाठी मनमानी पद्धतीने या औषधांची मागणी करता येणार नाही.

गेले काही दिवस या दोन औषधांची मागणी सर्व थरातून होत होती. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांना रेमडीसीवीर अथवा टोसीलीझुमॅब औषध देण्याबाबत डॉक्टरांचा आग्रह दिसत होता. यातून प्रमुख औषध वितरकांकडे मध्यरात्री या औषधांच्या खरेदीसाठी रांगा लागून काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. यातूनच या दोन औषधांचा काळाबाजार सुरु होऊन त्याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनानेही कारवाई सुरु केली.

“रेमडीसीवीर या औषधाचा करोना रुग्णांचे मृत्यू रोखण्यात शंभर टक्के उपयोग होते असे आढळून आलेले नाही तसेच रुग्णाचा रुग्णालयीन कालावधी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत असल्याचा निष्कर्ष काही देशातील पाहाणीत आढळून आले आहे. मात्र रेमडीसीवर व टोसीलीझुमॅब ही काही करोनावरील जादुई औषधे नाहीत, या मतावर भारतातील व जगभरातील डॉक्टरांमध्ये मतैक्य आहे. कोणत्याही औषधाचा जसा फायदा आहे तसेच त्याचे साईड इफेक्टही असल्या”चे मुंबईतील करोना मृत्यूंचे विश्लेषण करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. “मुळात रेमडीसीवीर व टोसीलीझुमॅब ही औषधे कोणत्या रुग्णांना दिली पाहिजे व त्याचे प्रमाण हे निश्चित करण्याची आवश्यकता असून यकृत, मूत्रपिंड, गर्भवती महिला व मुलांना रेमडीसीवीर दिले जाऊ नये” असे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. ज्या रुग्णांना न्युमोनिया वा क्षयरोग आहे अशांना टोसिलीझुमॅब देऊ नये असेही डॉ. सुपे म्हणाले.

“रेमडीसीवीर हे अॅन्टी व्हायरल औषध असून साधारणपणे पंधरा टक्के लोकांना ते उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. तसेच टोसीलीझुमॅब औषध देण्यापूर्वी डेक्सामिथाझॉन हे औषध आधी देऊन त्याचे परिणाम तपासून आवश्यक वाटल्यास टोसीलीझुमॅब औषध द्यावे”, अशी भूमिका डॉ. अविनाश सुपे यांनी मांडली. रेमडीसीवीर व टोसीलीझुमॅब ही औषधे सरसकट देऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका मुंबई टास्क फोर्सचे सदस्य व लीलावती रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी मांडली. एकीकडे खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांकडून या औषधांची मागणी वाढू लागली तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून या औषधांच्या तात्काळ खरेदीचा आग्रह धरला जाऊ लागला. मात्र करोनाच्या कोणत्या रुग्णासाठी व किती प्रमाणात हे औषध दिले पाहिजे याबाबत सरकारच्या म्हणजेच आरोग्य विभागाची कोणतीही ठोस मार्गदर्शक तत्वे नव्हती. तस पाहिले तर या दोन्ही औषधांमुळे करोना रुग्णांचे मृत्यू टाळता येतात याला कोणताही ठोस आधार अद्यापि जगभरातील तज्ज्ञ गटांना मिळालेला नाही.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने रेमडीसीवीर, टोसीलीझुमॅब व फेबीपीरावीर या औषधांच्या वापराबाबतची मार्गदर्शक तत्वे शनिवारी जाहीर केली आहेत. यात मॉडरेट व गंभीर रुग्णांसाठीच रेमडीसीवीरचा वापर केला जावा तसेच ५० वर्षांच्या आतील रुग्ण तसेच ६० वर्षाच्या रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करून टोसीलीझुमॅब वापरले जावे. रुग्ण अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल हवा तसेच सायटोकाईन स्टॉर्म असणे आवश्यक आहे. रुग्णाची ऑक्सिजनची पातळी व तापाचे प्रमाणही टोसीलीझुमॅब वापरताना किती असावे याचे प्रमाण या मार्गदर्शक तत्वात आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. तसेच ही औषधे कोणत्या करोना रुग्णांना देऊ नयेत तेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार ज्या रुग्णांना बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. एकाचवेळी अनेक अवयव निकामी झाले आहेत. हृदयविकाराचा त्रास आहे. प्लेटलेट्स ५० हजारापेक्षा कमी आहेत अशा करोना रुग्णांना ही औषधे देऊ नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या करोना रुग्णांना ही औषधे द्यायची आहेत त्यांना कोणत्या प्रमाणात या औषधांचे डोस दिले पाहिजे तेही सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने यासाठी जगभरातील या विषयावरील तज्ज्ञांची मते अभ्यासली तसेच भारतातील तज्ज्ञ, आयसीएमआरची मार्गदर्शक तत्वे आदी सर्वांचा आढावा घेऊन रेमडीसीवीर व टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबाबची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे आम्ही सर्व रुग्णालये तसेच माध्यमातून जाहीर करणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.