मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांना आतापासूनच प्रतीक्षा यादीचे फलक लागले आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून १५ सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजारपार गेल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप होत असून, रेल्वेने मात्र तो फेटाळला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, त्यानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची रेल्वेच्या तिकिटासाठी धडपड सुरू आहे. करोनाचे सावट कमी झाल्याने यंदा उन्हाळी सुट्टीबरोबरच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे.

गणेशोत्सवानिमित्त रेल्वे तिकीट आरक्षणास १६ मेपासून सुरुवात झाली. गेल्या चार दिवसांपासून अनेक प्रवासी आरक्षण केंद्र, आयआरसीटीसी आणि खासगी संकेतस्थळासह अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करीत रेल्वेची तिकिटे काढत आहेत. गुरुवार, १८ मे रोजी सकाळी ८ नंतर अवघ्या दीड मिनिटांतच कोकणकन्या रेल्वेची प्रतीक्षायादी हजारपार गेली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश झळकत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.

रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाडय़ांच्या तिकीट आरक्षणामध्ये दलाल सक्रिय आहेत. त्यांच्यावर कारवाई केली तरी तिकीट विक्रीतील गैरप्रकाराला चाप बसत नाही. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

शयनयान श्रेणीची प्रतीक्षा यादी ४०० च्या वर

जाता कामा नये. मात्र, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी एक हजारापार गेली. रेल्वे प्रशासनाने त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रतीक्षा यादीतील ४०० च्या वर गेलेली तिकिटे रद्द करून प्रवाशांना त्याचा पूर्ण परतावा द्यावा. रेल्वे प्रशासनाने विशेष जादा गाडय़ा सोडाव्यात आणि तिकीट आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांऐवजी ६० दिवसांचा करावा. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी एकाच वेळी तिकिटे काढल्याने प्रतीक्षा यादी वाढली असावी. यात दलालांचा हस्तक्षेप नसावा. प्रतीक्षा यादीतील ४०० च्या वरील प्रवाशांचे तिकीट रद्द करून शुल्काचा पूर्ण परतावा करण्यात येईल. तसेच विशेष गाडय़ा सोडण्याचे नियोजन सुरू आहे. – डॉ. शिवराज मानसपुरे,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reservation of konkan railway in ganpati festival full in one and a half minutes mumbai print news zws