कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी हाणामारी केली म्हणून या नगरसेवकांना ‘शिक्षा’ देण्यासाठी सेनेच्या ३१ नगरसेवकांचे राजीनामे जिल्हा संपर्कप्रमुखांनी घेतले. जिल्हा संपर्कप्रमुखांनी आपल्या नगरसेवकांचे राजीनामे जमा करून पालिका आयुक्तांकडे देण्याऐवजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. राजीनामे मंजूर करण्याचा अधिकार आयुक्तांना असल्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा नेत्यांनी राजीनाम्याची नौटंकी केली असल्याची टीका निष्ठावान शिवसैनिक आणि अन्य पक्षीयांकडून होऊ लागली आहे.
पालिकेचा सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे ही ‘दुभती गाय’ सत्ताधारी शिवसेनेला सहजासहजी सोडून देणे शक्य होणार नाही. या ‘दुभते’पणामुळेच सभागृहात हाणामारी करणारे सेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी दोन वेळा स्थायी समितीचे सभापती होऊ शकले. विद्यमान स्थायी समिती सभापतींचे कोणते ‘प्रताप’ सुरू आहेत. मातोश्री आणि जिल्हा नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच हे  शक्य होत असल्याची टीका होत आहे. मातोश्रीवरील ‘किचन कॅबिनेट’च्या पाठबळामुळेच होणाऱ्या महिला महापौर शहर विकासापेक्षा स्व-विकासाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
पालिकेतील ‘अर्थकारण, पदावरून पायउतार झाल्यानंतरची ‘सोय’ याभोवतीच सध्या कल्याण-डोंबिवली पालिकेचे राजकारण फिरत आहे. महसुली तज्ज्ञ आयुक्त शंकर भिसे यांनी कधीच पालिकांचे प्रशासन चालविले नसल्याने त्यांच्या या अज्ञानाचा लाभ नगरसेवकांकडून उचलला जात आहे.
शिवसेना नगरसेवकांचे कान उपटण्यासाठी, त्यांची ‘शाळा’ घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर सर्व सेनेच्या नगरसेवकांना आमंत्रित केले आहे. या वेळी संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation drama of kalyan dombivali shiv sena corporators