मुंबई : मागील काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पालिका प्रशासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्तीवेतन व त्यासंदर्भातील इतर लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे विविध मागण्यांसाठी महानगरपालिका व बेस्ट प्रशासनातील अनेक कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मराठा आंदोलनामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; नव्वदपेक्षा जास्त एसटी बसची तोडफोड

महानगरपालिकेतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत अनेकदा पालिकेमध्ये बैठका झाल्या आहेत. नुकतेच मुंबई जिल्हा उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निवृत्तीवेतनासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेन्शन अदालत आयोजित केली होती. मात्र, त्यातूनही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. सेवेतून निवृत्त होऊन तीन ते चार वर्षे उलटूनही सेवानिवृत्तीचे लाभ तसेच निवृत्तीवेतन मिळत नसल्याने, तसेच विविध मागण्यांसाठी महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रमाच्या कर्मचारी व कामगारांनी आझाद मैदानावर २६ ऑक्टोबरपासून आंदोलन पुकारले आहेत.

हेही वाचा >>> आशा सेविकांचे १ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन

निवृत्तीवेतन व इतर संबंधित मागण्यांसाठी अनेकदा मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भेटण्यास असमर्थता दर्शविली, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सेवानिवृत्तीच्या लाभासोबत निवृत्ती वेतन सुरू करावे अन्यथा बेमुदत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकर्त्यांनी दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired employees protesting against mumbai municipal corporation mumbai print news zws