ऐन गणेशोत्सावाच्या काळात मुंबईतील महिलेला पुण्यात विघ्नहर्ताचं भेटल्याचा अनुभव आला. वडिलांना अर्धांवायूचा झटका आल्याने त्यांच्या आजारपणासाठी नातेवाईकांडून उसने घेतलेले २० हजार रुपये महिलेकडून रिक्षात विसरले. अशा संकटात प्रामाणिक रिक्षा चालकाने रक्कम निगडी पोलीस ठाण्यात आणून मूळ मालकाला परत केले. महेंद्र निवृत्ती अरवडे असे या रिक्षा चालकाचे नाव असून, प्राजक्ता दिलीप गोळे असे मूळ महिलेचे नाव आहे.

प्राजक्ता यांच्या वडिलांना अर्धांवायूचा झटका आला होता. त्या मूळ ठाणे-मुंबई येथील असून पिंपरी-चिंचवडमध्ये वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परिस्थिती नाजूक असल्याने शहरातील नातेवाईकांकडून त्यांनी उसने २० हजार रुपये घेतले होते. प्राजक्ता रूपीनगर येथे जात होत्या. त्यांना तातडीने वडिलांना घेऊन कर्नाटक येथे जायचे होते. तिथे अर्धांवायूवर उपचार करण्यात येणार होते. त्यामुळेच त्या घाईत होत्या. त्यांनी चिंचवड ते टिळक चौक निगडीपर्यंत रिक्षाने प्रवास केला. वडिलांकडे जाण्याच्या घाईत प्राजक्ता यांच्याकडून २० हजार रुपये असलेली बॅग रिक्षातच विसरून राहिली. आपल्याकडे बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पुन्हा टिळक चौकातील रिक्षा स्टँडवर गेल्या मात्र, तोपर्यंत रिक्षा चालक महेंद्र हे निघून गेले होते. त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही भेटले नाही. नंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. प्रॉपर्टी मिसिंगची निगडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.

दरम्यान, रिक्षा चालक महेंद्र निवृत्ती अरवडे यांनी संबंधित पैसे असलेली बॅग आणि महत्वाची कागदपत्रे घेऊन निगडी पोलीस ठाणे गाठले. संबंधित घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांना देण्यात आली. निगडी पोलिसांत तक्रार नोंद असल्याने प्राजक्ता यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्यात आला. त्यानंतर रक्कम प्राजक्ता यांना सुपूर्द करण्यात आली. पैसे हरपल्याचे विघ्न ओढवलेल्या प्राजक्ता यांना पैसे मिळताच आनंदाने भरून आले. मात्र, त्या बाहेरगावी असल्याने त्यांनी भाऊ सुभाष गोळे यांना निगडी पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समक्ष २० हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग प्रामाणिक रिक्षा चालकाने सुभाष यांच्याकडे दिली. यावेळी रिक्षा चालक महेंद्र यांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षण सुनील टोनपे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.