मुंबई : कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातही महिलांमध्ये स्तन कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने ९ ते १४ वयोगटातील मुलींचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेनेही नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी कर्करोग नियंत्रण मॉडेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी कारणीभूत असलेल्या ह्युमन पॅपिलोमा विषाणू (एचपीव्ही) हा तोंडाचा कर्करोग होण्यासही कारणीभूत असतो. त्यामुळे या कर्करोगावर मात करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दुरावलेली बिबट्याची तीन पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा जगभरातील महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनत आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने गर्भाशयाचा खालील भाग जो योनीला जोडलेला असतो. तेथे होतो. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक कारण हे ह्युमन पॅपिलोमा विषाणू हे आहे. ह्युमन पॅपिलोमा विषाणू हा सामान्य लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. याचे चार प्रकार असून, त्यातील प्रकार १६ आणि प्रकार १८ हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी संबंधित असतात. या दोन प्रकारांच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींचे हळूहळू कर्करोगामध्ये रुपांतर होते. त्याचप्रमाणे कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, धूम्रपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा दीर्घकाळ वापर यामुळे हा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. त्याचप्रमाणे जर एकद्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला कर्करोग झाला असल्यास तिला तो होण्याची शक्यता अधिक असते.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील २०१५ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण, नियमित तपासणी आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे आवश्यक आहे. एचपीव्ही ही लस कर्करोगासाठी कारणीभूत सर्व घटाकांपासून संरक्षण करते. ही लस विशेषत: पौगंडावस्थेमध्ये दिली जाते. पहिल्यांदा लैंगिक संभोग करण्यापूर्वी ही लस घेणे आवश्यक असते. पहिला लैंगिक संभोग बऱ्याचदा असुरक्षित असतो. अशावेळी ही लस घेतल्यास ह्युमन पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग रोखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सातत्याने मौखिक संभोग केल्याने पुरुषांनाही ह्युमन पॅपिलोमा विषाणूमुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या संभोगापूर्वी ही लस पुरुष व महिलांनी घेतल्यास दोघांचेही कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत होते, अशी माहिती वरिष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा लक्षात येण्याजोगी लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे या कर्करोगाचे निदान करण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक असते. ह्युमन पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग जसजसा वाढत जाईल तसतशी याची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान, रजोनिवृत्तीनंतर किंवा लैंगिक संभोगानंतर असामान्य रक्तस्त्राव होत असल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ओटीपोटाच्या भागात किंवा लैंगिक संभोगादरम्यान सतत वेदना हे प्रगत गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अचानकपणे वजन कमी होणे तसेच सततचा थकवा हे प्रगत गर्भाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात.

नियमित तपासणी करणे आवश्यक

गर्भाशयच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचण्या, गर्भाशयाच्या ग्रीवाच्या विकृती लवकर शोधण्यासाठी महत्त्वपर्ण आहेत. पॅप स्मीअर ही चाचणी कर्करोगपूर्व किंवा कर्करोगाचे बदल ओळखण्यासाठी केली जाते. एचपीव्ही चाचणीमध्ये ह्युमन पॅपिलोमा विषाणूंची तपासणी केली जाते. नियमित तपासणी केल्यास कर्करोगाची बाधा ओळखणे शक्य होते.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण हे कमी-उत्पन्न आणि विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. निरोध वापरून सुरक्षित लैंगिक संभोग केल्याने ह्युमन पॅपिलोमा विषाणू संक्रमणाचा धोका कमी होण्याची शक्यता असते. तसेच धूम्रपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने धूम्रपान सोडणे आणि कर्करोगाबाबत महिलांमध्ये जागरुकता निर्माण करून त्यांना सक्षम करणे, कर्करोगाला प्रतिबंध आणि लवकर ओळखण्यासाठी साधने उपलब्ध करून दिल्यास या कर्करोग रोखणे शक्य आहे. – डॉ. तुषार पालवे, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Risk of cervical cancer can reduce if hpv infection prevented mumbai print news zws