मुंबई : साताऱ्यातील प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पात दुर्गम भागातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटन स्थळी जाणे सुलभ व्हावे यासाठी रोप वेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नवीन महाबळेश्वराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्या आराखड्यात रोप वे प्रस्तावित आहे. जेथे रस्ते बांधणे किंवा दळणवळणाचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही तिथे रोप वे प्रस्तावित करण्यात येणार आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरवरील पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर विकसित केले जाणार आहे. त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली असून एमएसआरडीसीकडून नवीन महाबळेश्वरचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. हा विकास आराखडा तयार करताना येथील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर भर असणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जात आहे. त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन रस्ते, उपलब्ध रस्त्यांची दुरुस्ती अशा कामांना आराखड्यात प्राधान्य असणार आहे. त्याचवेळी जिथे रस्ते वा इतर कोणताही वाहतूक व्यवस्थेचा पर्यात उपलब्ध असणार नाही तिथे रोप वेचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – Mumbai Firing News : धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये गोळीबार; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

नवीन महाबळेश्वरमध्ये ज्या गावांचा समावेश आहे, त्या गावातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. तेथे पोहोचण्यासाठी रस्ते वा इतर कोणतीही साधने नाहीत. तेव्हा अशा गावांपर्यंत पोहोचण्यासाठी रोप वे प्रस्तावित करण्यात आला आहे. तर पर्यटकांना पर्यटनस्थळी सुरक्षित आणि अतिवेगाने पोहोचता यावे यासाठी काही पर्यटनस्थळीही भविष्यात रोप वेची सुविधा असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गावकऱ्यांना माफक दरात रोप वेची सुविधा कशी उपलब्ध होईल यादृष्टीनेही योग्य तो विचार केला जाणर असल्याचेही एमएसआरडीसीकडून सांगण्यात येत आहे. गड, किल्ले, पठार, मंदिर अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी रोप वेचा पर्याय नवीन महाबळेश्वरमध्ये असणार आहे.

हेही वाचा – वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करा; उच्च न्यायालयाचे महापालिका, रेल्वे प्रशासनाला आदेश

या ठिकाणी रोप वे प्रस्तावित

उत्तेश्वर मंदिर, घेरादातेगड किल्ला, रघुवीर घाट, मकरंद गड, वाल्मीक पठार, मजरेश शेमडी, महिंद गड, श्री चौकेश्वर मंदिर आदी ठिकाणी प्रारुप विकास आराखड्यात रोप वे प्रस्तावित असणार आहे.