केंद्रात सत्तांतर घडवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणाही जोरदार कामाला लागली असून मतदार यादीत नावनोंदणी मोहीम हाती घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. मोदींबद्दल आकर्षण असलेल्या तरुणवर्गासह भाजपकडे कल असलेल्या सर्वाची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संघ आणि भाजपनेही दोन आठवडय़ांची विशेष मोहीम हाती घेतली आहे.मतदारांची नावनोंदणी आणि मतदार यादी प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोगाने ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढविली आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातही भाजपला अनुकूल असलेल्या मतदारांची नावे मोठय़ा प्रमाणावर यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी संघ सक्रिय झाला असून कार्यकर्त्यांना ‘दक्ष’ राहण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये कधीही या पद्धतीने संघ यंत्रणेने पुढाकार घेतलेला नव्हता.जनकल्याण बँकेसारख्या भाजप किंवा संघ परिवारातील संस्थांची मदत घेऊन एसएमएस व अन्य माध्यमांद्वारे मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे.