मुंबई : अबुधाबी- मुंबई प्रवासादरम्यान विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाविरोधात सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फजल मोहम्मद ओट्टा पिलाकुल (२६) असे प्रवाशाचे नाव असून तो केरळमधील रहिवासी आहे. आरोपीविरोधात विमान अधिनियम १९३७ अंतर्गत सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदार निमेश सिरोया (३२) हे विलेपार्ले येथील रहिवासी आहेत. ते गेल्या पाच वर्षांपासून एका विमान कंपनीत वरिष्ठ सुरक्षा कार्यकारी म्हणून काम करतात. बुधवारी पहाटे अबुधाबी येथून मुंबईला जाणाऱ्या एका विमानाने उड्डाण केले होते. त्यावेळी आसन क्रमांक ३१ सी वरील प्रवासी शौचालयात गेला होता. तो शौचालयातून बाहेर पडल्यानंतर धुम्रपानाचा उग्रवास येऊ लागला. त्यावेळी विमानातील कर्मचारी प्रतिमा यांनी शौचालयात जाऊन पाहणी केली असता तेथे सिगारेटचे थोटूक सापडले.

हेही वाचा…म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनात पुन्हा धक्काबुक्की, खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विमानात सर्व प्रवाशांना दिसले अशा ठिकाणी धुम्रपानास मनाई असल्याचे चिन्ह लावण्यात आले होते. तसेच अबुधाबीहून विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानात धुम्रपान करण्यास मनाई असल्याची घोषणा कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानंतरही प्रवासी फजल मोहम्मद ओट्टा पिलाकुल याने विमानात धुम्रपान केले. त्याबाबत विमान कर्मचाऱ्यांकडून विचारले असता फजलने धुम्रपान केल्याचे मान्य केले. त्यावेळी त्याच्याकडील सिगारेटचे पाकीट तपासले असता त्यात सहा सिगारेट सापडल्या. विमान मुंबईला उतरल्यानंतर आरोपी प्रवासी फजलला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरोधात विमान अधिनियम १९३७ कलम ३७ व भारतीय न्याय संहिता कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahar police registered case against passenger who smoked on plane during abu dhabi mumbai journey mumbai print news sud 02