राज्य शासनाकडून फक्त घोषणाघाई!

क्रीडासंस्कृतीची पताका उंच फडकावण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आपल्याच आश्वासनांचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनी पदके कमावल्यानंतर झालेल्या आनंदाच्या भरात राज्य शासनाने सिंधू, साक्षी, तसेच साताऱ्याची धावपटू ललिता बाबर यांच्यासह ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या आणखी पाच क्रीडापटूंना रोख पारितोषिके जाहीर केली होती. त्यांपैकी सिंधू वगळता अन्य सर्वजण अजूनही त्या सन्माननिधीच्या प्रतीक्षेत असून, क्रीडाविश्वातून त्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करण्यात येत आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला यंदा दोन पदके मिळाली. त्यापकी बॅडमिंटन एकेरीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधणारी पी. व्ही. सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना गेल्या ६ सप्टेंबर रोजी मुंबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने गौरवले. सिंधूला ७५ लाख रुपयांचा आणि गोपीचंद यांना २५ लाखांचा धनादेश देण्यात आला. याच कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताची आणखी एक पदकविजेती, कुस्तीपटू साक्षी मलिक हिला ५० लाख रुपये आणि तिच्या प्रशिक्षकांना २५ लाखांचे इनाम जाहीर केले. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना पदक कमावता आले नाही. मात्र साताऱ्याच्या ललिता बाबर हिने स्टिपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीत दहावे स्थान पटकावले होते. या यशाबद्दल तिला ७५ लाख रुपये आणि तिच्या प्रशिक्षकांना २५ लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणाही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केली होती. याशिवाय नेमबाज आयोनिका पॉल, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, हॉकीपटू देवेंद्र वाल्मीकी, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे आणि धावपटू कविता राऊत यांनाही प्रत्येकी ५० लाख रुपये पारितोषिक देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रिओला जाऊन आलेल्या क्रीडापटूंचा छोटेखानी सत्कार तेवढा करण्यात आला. त्यानंतर ही पारितोषिके देण्याचा सरकारला बहुधा विसर पडला असावा, कारण ऑलिम्पिक होऊन तीन महिने उलटले तरी शासनदरबारी या सत्काराच्या कोणत्याच हालचाली दिसत नसल्याबद्दल क्रीडावर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात सांगितले की, पुरवणी प्रश्नांमध्ये याबाबत विषय पटलावर येईल, तेव्हा तो मंजूर करण्यात येईल आणि लवकरच या खेळाडूंना इनाम देण्यात येईल.