मुंबई : मुस्लीम धर्मियांचा ‘बकरी ईद’ सण काही दिवसांवर आला असून बजरंग दलाचे कार्यकर्ते मुस्लीम परिसरात फिरून कुर्बानी करू देणार नसल्याचे जाहीर सांगत आहेत. हत्यारांच्या जोरावर दहशत माजवणाऱ्या या समाजविघातक घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार व प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक संजय वर्मा यांना आमदार आझमी यांनी बुधवारी यासंदर्भात निवेदन दिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे बजरंग दलाने कुर्बानीला विरोध चालवला आहे. ७ जून रोजी बकरी ईद आहे. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची मुस्लीम धर्मियांची प्रथा आहे. राज्यात गोवंशाच्या हत्येस बंदी आहे. मात्र बकऱ्याच्या कुर्बानीला विरोध करणे बेकायदा असून दहशत माजवणाऱ्या या प्रवृत्तींना अटकाव करावा. बकरी ईद सण दोन दिवसांवर आला आहे. समाजविघातक घटक राज्यातील कायदा व सुव्यस्था बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात चोख बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी आमदार आझमी यांनी केली आहे.

राज्य गोसेवा आयोगाने ‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनावरांचे बाजार बंद करण्याचे बेकायदा आदेश दिले होते. त्यामुळे बकऱ्यांची खरेदी-विक्री थांबली होती. परिणामी, शेतकरी, व्यापारी, पशुपालक आणि मुस्लीम धर्मीय गोसेवा आयोगाच्या त्या पत्राने अडचणीत आले होते. त्या पत्राला मुस्लीम धर्मिय नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.